भंगार बाजारावर कोणत्याही क्षणी कारवाई; २४ तासांचा अल्टिमेटम

भंगार बाजारावर कोणत्याही क्षणी कारवाई; २४ तासांचा अल्टिमेटम

महापालिकेने यापूर्वी दोन वेळा भंगार बाजाराचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले होते.

सातपूर-अंबड लिंकरोडवर अनधिकृत भंगार बाजार थाटणार्‍या व्यावसायिकांना महापालिकेने शुक्रवारी, १६ ऑगस्टला नोटीस बजावत २४ तासांत अतिक्रमणे काढून घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने याच ठिकाणी यापूर्वी दोन वेळा मोठी कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही भंगार व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने याविरोधात नगरसेवक तथा याचिकाकर्ते दिलीप दातीर यांनी महासभेत लक्षवेधी मांडली होती.

भंगार बाजार बसवण्यासाठी पालिका प्रशासनच अंतर्गत मदत करत असल्याचा आरोप दातीर यांनी केला होता. या आरोपांची दखल घेत अखेर महापालिका प्रशासनाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली. त्यात सातपूर स्क्रॅप मर्चंट असोसिएशनचे सदस्य, अनधिकृत बांधकामे उभारून भंगार व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्व्हे क्रमांक ४४० व ४४३ मध्ये असलेली अतिक्रमणे, भंगार संकलन, विक्रीसाठीचे शेड, बांधकाम, या जागेवरील डेब्रीज, भंगार व अतिक्रमणे २४ तासांत काढून घ्यावीत. अन्यथा महापालिका कोणत्याही क्षणी थेट कारवाई करेल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीचे केंद्र बनलेल्या या भंगार बाजाराविरोधात दातीर यांनी याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने ९ जानेवारी २०१७ आणि ११ ऑक्टोबर २०१७ रोजी हे अतिक्रमण तातडीने हटविण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
त्यानंतर महापालिका प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात दोन वेळा हा भंगार बाजार हटवला होता.

असे आहेत उच्च न्यायालयाचे आदेश

अनधिकृत भंगार बाजारातील व्यावसायिकांनी हा व्यवसाय करायचा नाही. तोडलेले स्क्रॅप मटेरियलदेखील शहरात न नेता ते महापालिका हद्दीबाहेर त्यांच्या स्वतःच्या जागेत न्यावे. व्यावसायिकांना पालिका किंवा महाराष्ट्र शासन यांनी कोणतीही जागा देण्याची काही गरज नाही. त्यांना हा अनधिकृत भंगारचा व्यवसाय करू न देण्याची सर्व जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील.

First Published on: August 17, 2019 8:16 AM
Exit mobile version