टेरेसवरील दोन हॉटेल्स पालिकेकडून सील

टेरेसवरील दोन हॉटेल्स पालिकेकडून सील

प्रातिनिधीक फोटो.

अनधिकृतपणे वापर सुरू असलेले टेरेसवरील दोन हॉटेल्सवर कारवाई करत महापालिकेने हे दोन्हीही हॉटेल्स सील केले. तब्बल वर्षभरानंतर अचानक पालिकेने ही कारवाई केल्याने, अन्य अनधिकृत व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहे.

मुंबईतील कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेने टेरेसवर सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई हाती घेतली होती. त्याचाच भाग म्हणून शहरातील आणखी तीन हॉटेल्सवर शुक्रवारी, ३ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. त्यात शरणपूर रोडवरील हॉटेल पतंग व २४ सेंच्युरी या दोन हॉटेल्सचाही समावेश आहे. या दोन्हीही हॉटेल्स पालिकेच्या नगररचना विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभागाने सील केल्या. तर, पंडीत कॉलनीमधील हॉटेल कोपा कबानाचे काही साहित्य जप्त केले. पालिकेच्या या संयुक्त कारवाईचा अन्य अनधिकृत हॉटेल्स चालक व व्यावसायिकांनी मात्र चांगलाच धसका घेतला आहे.

शहरातील अनधिकृत हॉटेल्सच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानंतर एप्रिल-मे २०१८ मध्ये पालिकेच्या नगररचना विभागाने सर्वेक्षण करत, शहरातील बेसमेंट व टेरेसवरील अनधिकृत हॉटेल्सची यादी तयार केली होती. त्यानुसार शहरात बेसमेंटमध्ये २५, तर टेरेसवर २१ अशी ४६ हॉटेल्स आढळून आली होती. कारवाईचा भाग म्हणून नगररचना विभागाने टेरेसचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्या हॉटेल्ससह गोडावून व दुकाने अशा ३३४ व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनासमोरील सुयोजित कॉम्प्लेक्स आणि बाफना कॉम्पेक्सचादेखील समावेश होता. यासंदर्भातील माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागालाही देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम कारवाईची तयारी पालिकेने सुरू केली होती. यादीनुसार शहरातील टेरेसवर सुरू असलेल्या हॉटेल्सवर कारवाईदेखील झाली होती.

वर्षभरानंतर आली जाग

कमला मिलच्या घटनेनंतर पालिकेच्या नगररचना विभागाने सर्व्हेक्षण करत टेरेसवरील अनधिकृत हॉटेल्सची यादीच अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे सोपविली होती. त्यानंतर कारवाईदेखील झाली. मात्र, या कारवाईतून या दोन हॉटेल्स सोयीस्कररित्या सुटल्या की सर्व्हेक्षणातूनच वगळल्या गेल्या होत्या, याबाबतच आता चर्चा सुरू आहे.

First Published on: May 3, 2019 11:04 PM
Exit mobile version