मांसविक्री करणार्‍या ८४ दुकानांची पालिका करणार पाहणी

मांसविक्री करणार्‍या ८४ दुकानांची पालिका करणार पाहणी

शहरात उघड्यावर मांस विक्री होत असल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. या मांस विक्रीच्या दुकानामुळे अस्वच्छतेसोबतच भटक्या कुत्र्यांचीही संख्या वाढत चालली आहे. शहरात उघड्यावर मांस विक्री करण्यासंदर्भात धोरण नाही. महापालिकेने तब्बल दहा वर्षांपूर्वीच मांस विक्रीसाठी एक नियमावली तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. मात्र त्यास मान्यता मिळत नसल्यामुळे त्यावर कारवाई करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नवीन धोरण तयार केले आहे. त्याला स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे. उघड्यावर मांस विक्री बंद करण्यात आली असून, बंदिस्त ठिकाणी मांस विक्रीसाठी पालिकेने परवाना बंधनकारक केला आहे. परवानाधारक मांस विक्रेत्यांकडून शहराचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना होऊन पालिकेलाही महसूल मिळणार आहे. दरम्यान, १ जानेवारीपासून मांस विक्री करणार्‍या दुकानांचे सर्वेक्षण करण्यात येणार होते. परंतु हे सर्वेक्षण आठवडाभर पुढे ढकलण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी ८४ अर्ज प्राप्त झाले आहे. या दुकानदारांच्या दुकानांची पाहणी करण्यात येऊन त्यांना परवानगी देण्यात येईल.

अस्वच्छता केल्यास पाचशे रुपये दंड

परवाना मिळाल्यानंतर जर संबंधित विक्रेता दुकानाबाहेर मांस लटकवून व्यवसाय करीत असेल, तर त्यावर अस्वच्छता केल्याप्रकरणी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यात बदल केला नाही, तर परवाना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, ज्यांनी आतापर्यंत परवाने घेतले नाहीत त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

First Published on: January 3, 2020 1:11 PM
Exit mobile version