तोतया पोलिसांचा सुळसुळाट

तोतया पोलिसांचा सुळसुळाट

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचे प्रकार रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असतानाच आता पुन्हा तोतया पोलिसांकडून दागिने लुटण्याचे सत्र सुरू झाले आहे. सहा दिवसांत तीन घटनांमध्ये तीन लाखांचे दागिने लुटल्याने नागरिकांबरोबर पोलीस यंत्रणाही धास्तावली आहे. शहर व जिल्ह्यात अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

निफाडजवळील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर रसलपूर फाट्याजवळ सीआयडी पोलीस असल्याने भासवत दोन भामट्यांनी दुचाकी चालकाचे २५ हजार रुपये व सोन्याची चेन लंपास केल्याची घटना ताजी असतानाच नवीन आडगाव नाका, मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली दोन भामट्यांनी पोलीस असल्याचे भासवून वृद्धाला २९ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोपटभाई गोहिल (६८, रा. सेवाकुंज, निमाणी, पंचवटी) शनिवारी दुपारी आडगाव नाका येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून अनोळखी दोघे त्यांच्याजवळ आले. विनाकारण का फिरता, पुढे पोलीस तपासणी सुरू असून तुमच्या पिशवीत गांजा असल्याची माहिती मिळाली आहे, असे सांगत दोघांनी त्यांच्या पिशवीची तपासणी केली. त्यातून दोघांनी त्यांचा विश्वास संपादन केला. दोघांनी त्यांच्या खिशातील पाकिट, सोन्याची अंगठी काढून घेत त्या पिशवीत ठेवल्याचे भासवून लंपास केल्या. ही बाब दोघे निघून गेल्यानंतर पिशवी तपासणी केली असता लक्षात आली. याप्रकरणी गोहिल यांनी पोलिसांत तक्रार केली .

चोरट्यांपुढे स्मार्ट पोलिसिंग निष्प्रभ

स्मार्ट पोलिसिंगसाठी शहर व ग्रामीण पोलीस दलात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातच आता कोणतीही आपत्ती ओढवली की त्या-त्या विभागांचा क्रमांक आठवून फोन करण्याचा त्रास वाचणार आहे. कारण, सरकारच्या नव्या निर्णयानुसार केवळ ११२ हा क्रमांक डायल करुन पोलीस, अग्निशमन अशा तातडीच्या सेवा एकाच ठिकाणी लवकरच उपलब्ध होणार आहेत. जुलै महिन्याच्या प्रारंभापासून ११२ या एकाच टोल-फ्री हेल्पलाइनवरुन सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा क्रमांक डायल केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, असे नियोजन केले जात आहे. त्यासाठी ग्रामीण पोलिसांना वाहने देण्यात आली असून, पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्यक्षात लॉकडाऊन शिथिल होताच लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाने स्मार्ट पोलिसांना चोरटे एकप्रकारे आव्हान देत असल्याचे वाढत्या लुटमारीच्या घटनांवरुन दिसून येत आहे.

First Published on: June 21, 2021 10:20 AM
Exit mobile version