ओटीपी मिळवून नाशिकरोडच्या वृद्धाचे ऑनलाइन २ लाख लांबवले

ओटीपी मिळवून नाशिकरोडच्या वृद्धाचे ऑनलाइन २ लाख लांबवले

प्रातिनिधीक फोटो

नाशिक सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून लोकांच्या अज्ञानाचा फायदा उचलत फसवणूक होत असल्याच्या घटना शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. एका व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधून ऑनलाइन फॉर्म भरत असताना खात्यातून गेलेले पैसे परत जमा करून देतो, असे सांगून ज्येष्ठ नागरिकाकडून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर खात्यातून २ लाख २२ हजार ५०० रूपये काढत त्यांची फसवणूक केली. ही घटना मंगळवारी (२२ जानेवारी) दुपारी २ ला नाशिकरोडच्या एकलहरे रोडभागात घडली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

योहान शिवराम मोरे (७९, भोरमळा, संभाजीनगर, एकलहरे रोड) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोरे यांनी एका संकेतस्थळावर ऑनलाइन फॉर्म भरला होता. त्यानंतर ऑनलाइन पैसे भरण्यासाठी सर्व माहिती भरली, पण पैसे जमा झाल्याची पावती न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मिळण्यासाठी ऑनलाइन प्रयत्न केले. त्यावेळी एका व्यक्तीने ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१८ दरम्यान फोन करीत स्टेट बँक ऑफ इंडियाचा खाते क्रमांक १०८२५५१३४४४, एटीएम क्रमांक, ओटीपी क्रमांक विचारला. मोरे यांनी समोरील व्यक्तीने विश्वास ठेवत सर्व माहिती सांगितली. त्याआधारे अज्ञात व्यक्तीने मोरे यांच्या खात्यातून ऑनलाइन माध्यमातून दुसर्‍या खात्यात २ लाख २२ हजार ५०० रूपये परस्पर काढून घेतले. पोलीस निरीक्षक बारसे तपास करीत आहेत.

ओटीपी सांगू नका

एखाद्या व्यक्तीने मोबाइलवर संपर्क करून बँक खात्याची माहिती मागितल्यास देऊ नये. खात्री करून घेतल्याशिवाय कोणालाही खाते क्रमांक सांगू नये. तसेच ओटीपी क्रमांक खातेदाराने कोणालाही सांगू नये, असे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बारसे यांनी आवाहन केले आहे.

First Published on: January 24, 2019 2:17 PM
Exit mobile version