फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून थकबाकीदारांना मारहाण

फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून थकबाकीदारांना मारहाण

जखमींचे नातेवाईक सिव्हीलमध्ये जमल्यानंतर तणाव निर्माण झाला होता.

श्रीराम फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज फेडत नसल्याच्या कारणावरून कंपनीच्या वसुली कर्मचार्‍यांनी तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी, २४ एप्रिलला वडाळा गावात घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हाजी रियाज शेख यांचे मदिनानगरमध्ये मदार स्क्रॅप सेंटर आहे. शेख यांनी दैनंदिन कामकाजासाठी छोटा हत्ती वाहन खरेदी केले होते. या वाहनासाठी त्यांनी श्रीराम फायनान्सकडून कर्ज घेतले होते. वेळेवर कर्ज न फेडता आल्याने श्रीराम फायनान्सकडून विचारणाही झाली. कर्ज वसुलीसाठी श्रीराम फायनान्सचे ५-६ जण शेख यांच्या मदार स्क्रॅप सेंटरवर आले. त्यावेळी शेख यांच्याकडे ८० हजार रुपयांची रोकड होती. ती रोकड गल्ल्यात ठेवत असताना श्रीराम फायनान्सचे कर्जवसुली करणारे वाहन टोईंग करण्यासाठी आले. मात्र, ५-६ जणांनी वाहन टोईंग करण्याऐवजी हाजी रियाज शेख यांच्यासह अश्पाक शेख व अल्ताफ शेख यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, शेख यांच्या गल्ल्यातील ८० हजारांची रोकड अज्ञात व्यक्तीने लुटल्याचे बोलले जात आहे.

शेख कुटुंबियांना मारहाण झाल्याचे समजताच वडाळातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने मदिनानगरमध्ये जमा झाले. जखमींना ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालय परिसरात श्रीराम फायनान्स वसुली करणार्‍यांच गट व शेख कुटुंबियांचा गट आला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावमय परिस्थिती निर्माण झाली होती. सुरक्षारक्षकांनी रुग्णाच्या सुरक्षेतेसाठी तत्काळ मुख्य गेट बंद केले. तसेच, रुग्णालय परिसरात मुंबईनाका व सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

First Published on: April 24, 2019 10:05 PM
Exit mobile version