लहवितला बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

लहवितला बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

भगूर – दिंडोरी तालुक्यातील मोहाडीत काल बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. दारणाकाठीही अनेक बिबटे जेरबंद झाले. मात्र, अद्यापही बिबट्यांची दहशत कायम आहे. लहवीत भागातल्या माळवाडी परिसरात राहणार्‍या सुनील काणे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली. काणे हे शेताकडे जात असताना झाडांमध्ये दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

काणे यांनी प्रसंगावधान राखत जराही न घाबरता बिबट्याला जोराने फटका मारत स्वतःचा बचाव केला. या फटक्याने भांबावलेल्या बिबट्याने पळ काढला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यानं काणे यांच्या मानेसह हात आणि छातीवर जखमा झाल्या. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दरम्यान, वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसंच, ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिंजरा लावला.

वनरक्षक विजय पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लहवितचे पोलीस पाटील संजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मुठाळ, राकेश वरूनगसे, बाळा सोनवणे, सचिन जारस ,भाऊसाहेब घनदाट यांच्या सहकार्याने माळवाडी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. दरम्यान, लहवीतरोडलगत यश पाटील यांच्या मळ्यातील पाळीव कुत्र्यालाही गुरुवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्याने फरफटत नेले. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे शेतातील चारीमध्ये दिसून आले आहेत. बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

First Published on: October 22, 2020 7:54 PM
Exit mobile version