नाशकात बिहारराज; दरोडेखोरांच्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृ्त्यू

नाशकात बिहारराज; दरोडेखोरांच्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृ्त्यू

दरोड्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने नाकेबंदी केली होती.

गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, शुक्रवारी (दि. १४) भरदिवसा चार सशस्त्र दरोडेखोरांनी उंटवाडी भागातील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकला. या वेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात कंपनीचा एक कर्मचारी जागीच ठार झाला, तर व्यवस्थापकासह अन्य एक कर्मचारी जखमी झाला. सायरनच्या आवाजाने घाबरलेले दरोडेखोर पसार झाले. या घटनेमुळे नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स कार्यालयातील लुटीसाठी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सहा दरोडेखोर दुचाकीवरून आले. त्यातील दोघे दुचाकीजवळ थांबले, तर चार दरोडेखोरांनी कार्यालयात प्रवेश केला. या सर्वांकडे पिस्तुल होते. तर, एकाच्या हाती कुर्‍हाड होती. या वेळी कार्यालयात ६ कर्मचारी व ३ ग्राहक उपस्थित होते. दरोडेखोरांनी सुरुवातीस शस्त्रांचा धाक दाखवत सोने व पैसे असणार्‍या लॉकर्सच्या चाव्या मागत सर्वांचे मोबाइल ताब्यात घेतले. दरोड्याचा प्रयत्न लक्षात येताच मुरियायीकारा साजू सॅम्युअल या कर्मचार्‍याने सायरन वाजवला. त्यामुळे बिथरलेल्या दरोडेखोरांनी व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे व कैलास जैन यांच्यावर हल्ला केला. सायरन वाजवल्याच्या रागातून दरोडेखोरांनी सॅम्युअलला एका कोपर्‍यात ढकलत मारहाण सुरू केली. त्याच्या प्रत्युत्तरामुळे आणखी घाबरलेल्या दरोडेखोरांनी सॅम्युअल याच्यावर थेट तीन गोळ्या झाडल्या. त्यात सॅम्युअल जागीच ठार झाला. दरोडेखोरांमधील दोघांनी चेहर्‍यावर मास्क लावलेला होता. त्यानंतर पोलीस येण्याची चाहूल लागल्याने सर्व दरोडेखोर काही क्षणांत फरार झाले. या घटनेमुळे सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील दहशत वाढली आहे.

वर्दळीच्या मार्गावरील थरार, नागरिकांत दहशत

त्रिमुर्ती चौक ते मायको सर्कल हा रस्ता सर्वाधिक वर्दळीचा आहे. असे असतानाही दरोडेखोरांनी बिहारप्रमाणेच भरदिवसा दरोडा टाकला. यावरुन दरोडेखोरांना या भागाची व कार्यालयाची चांगली माहिती असावी, असे सांगितले जाते आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही होती. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नाकाबंदी केली. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकही दाखल झाले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

मुथूट फायनान्सच्या याच कार्यालयात दरोडेखोरांनी हल्ला केला.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेले व्यवस्थापक देशपांडे.
First Published on: June 14, 2019 12:53 PM
Exit mobile version