मुथूट दरोडा; सूरतमधून एक संशयित ताब्यात

मुथूट दरोडा; सूरतमधून एक संशयित ताब्यात

मुथूट फायनान्सच्या याच कार्यालयात दरोडेखोरांनी हल्ला केला होता.

अवघ्या जिल्ह्याला हादरवून सोडलेल्या मुथूट दरोड्याप्रकरणातील एका संशयिताला पोलिस पथकाने बुधवारी, १९ जूनला सूरतमधून ताब्यात घेतले. त्यामुळे या दरोड्याचे धागेदोरे गुजरात व्हाया बिहारपर्यंत जाऊन पोहोचल्याचे सांगितले जाते आहे.

नाशिकमधून रवाना झालेल्या पोलिसांनी बुधवारी मूळचा बिहारचा आणि सध्या गुजरातच्या सूरतमध्ये राहत असलेल्या जितेंद्र सिंग याला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तपासाला गती मिळून मुख्य आरोपी लवकरच टप्प्यात येण्याची शक्यता आहे. दरोड्याच्या दुसऱ्याच दिवशी दरोडेखोरांनी वापरलेल्या तीन पल्सर पोलिसांनी पेठरोड भागातून ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर पोलिस तपासाला दिशा आणि गतीही मिळाली. या वाहनांची ओळख पटूच नये, यासाठी दरोडेखोरांनी बरीच छेडछाड केलेली होती. त्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातूनही धागेदोरे शोधत पोलिस मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी तपास करत आहेत. त्यासाठी १२ पथके राज्याबाहेर विविध भागांत पाठवण्यात आली आहेत. गुजरात व बिहारमधील स्थानिक पोलिसांची मदतही घेतली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सर्वदूर तपासाची चक्रे

दरोड्याच्या घटनांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार, तुरुंगातील संबंधित कैदी अशा सर्व बाजूने तपास करतानाच त्यासाठी आरटीओ, सायबर सेल, क्राईम ब्रँड आणि राज्याबाहेरील पोलिसांचीही मदत घेतली जाते आहे. सर्वदूर तपासाची चक्रे फिरवली जात असल्याने गुन्हेगार लवकरच टप्प्यात येण्याचे संकेत आहेत.

First Published on: June 19, 2019 11:44 PM
Exit mobile version