निर्यात बंदीनंतरही कांद्याने खाल्ला भाव

निर्यात बंदीनंतरही कांद्याने खाल्ला भाव

प्रातिनिधीक फोटो

निर्यात बंदीनंतरही सोमवारी कांदा दरात उसळी दिसून आली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 4251 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. शनिवारच्या तुलनेमध्ये सर्वोच्च भावामध्ये बाराशे रुपयांची वाढ दिसून आली. कळवणला साडेचार हजार तर अन्य बाजार समित्यांतही चार हजारांनजिक भाव दिसून आले. पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. जुन्या कांद्याची प्रतही काही प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत राज्यासह परराज्यातून मागणी वाढल्याने घाऊक कांद्याचा भावाने चार हजार रूपयांचे पुढे गेला आहे.

यंदा पावसामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी कांदा उत्पादक क्षेत्रात नवीन लागवड केलेले कांद्याचे पीक अतिपावसाने वाया गेले आहेत. यात सुमारे ५० टक्के नुकसान झाले आहे. शेतकरी जुना कांद्याची साठवणूक करतात. मात्र, मागील काही महिन्यांत प्रचंड उण आणि अचानक पाऊस अशा लहरी वातावरणामुळे साठवणुकीतील निम्मा कांदा खराब झाला आहे. कांद्याच्या वजनामध्ये आणि प्रतवारीमध्ये ही मोठी घट झाल्याने शेतकर्‍यांना या वाढीव भावाचा फायदा खूप होईल असे मात्र दिसत नाही. पावसामुळे उपलब्ध नवीन आणि जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात दाखल होत असलेल्या कांद्यामध्ये हलक्या आणि खराब दर्जाच्या कांद्याचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. पुढील काही दिवस कांद्याचे भाव तेजीत राहतील असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत.
येथील मुख्य बाजार समितीत १०९० वाहनांद्वारे १३८३२ क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला कमीत कमी ११०० जास्तीत जास्त ४२५१ तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

First Published on: September 21, 2020 8:48 PM
Exit mobile version