विखे-पाटलांच्या विमानाला दिला चुकीचा पत्ता!

विखे-पाटलांच्या विमानाला दिला चुकीचा पत्ता!

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित सर्वरोगनिदान शिबिराचा शुभारंभ करण्यासाठी २५ डिसेंबर रोजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लासलगाव दौऱ्यावर आलेल्या हेलिकॉप्टर चालकाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लासलगाव ऐवजी पुणे जिल्ह्यातील अक्षांश रेखांश कळवल्याबाबत विखे-पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची कान उघाडणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

सदर प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेला हलगर्जीपणा उघड झाल्याने आता निफाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशी सुरू झाल्याचीही माहिती सूत्रांनी ‘माय महानगर’ला दिली आहे.

१० मिनिटं हेलिकॉप्टर हवेतच!

वास्तविक पाहता मंत्री अगर आमदार यांचे लासलगाव येथे नेहमीच दौरे झाले. परंतु, असा प्रकार आजवर घडल्याचे ऐकिवात नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे प्रथमच हेलिकॉप्टरच्या वापर करून या दौऱ्यावर आले होते. परंतु हेलिकॉप्टर चालकास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील अक्षांश रेखांक्ष दिले गेले. त्यामुळे चालकाला दहा मिनिटे हवेतच घिरट्या मारत फिरावे लागले. परंतु, हेलिकॉप्टरचा चालक या पूर्वी देखील लासलगावला आलेला असल्यामुळे त्यांनी ही चूक सुधारून घेतली आणि हेलिकॉप्टर लासलगाव येथे लॅण्ड झालं. परंतु हा सारा प्रकार समजताच विखे पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून वरीष्ठ सार्वजनिक अधिकाऱ्यांकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या प्रकरणात शासनाने गंभीर दखल घेत कारवाई करण्यासाठी चौकशी सुरू केल्याचंही वृत्त आहे.

First Published on: December 27, 2018 9:44 PM
Exit mobile version