लखमापूरला केमिकल कंपनीस विरोध; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

लखमापूरला केमिकल कंपनीस विरोध; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

वणी : दिंडोरी तालुक्यात औद्योगिक क्षेत्रात सातत्याने वाढ होत असून काही कारखान्यांतील दूषीत पाण्याची समस्या ऐरणीवर आलेली असताना आता लखमापूर येथील केमिकल कंपनीविरोधात ग्रामस्थांनी आवाज उठविला आहे.
लखमापूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावाच्या पूर्वेस गट नंबर 236 मध्ये केमिल उद्योग व इतर उद्योगास ना हरकत देवू नये, तसेच त्यासंदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर विशेष ग्रामसभा घेऊन गावाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, याबाबत प्रांत अधिकारी व ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे मागणी करुनही गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीजवळ केमिकल युक्त उद्योगाला परवानगी दिलीच कोणी? असा सवाल उपस्थित करुन त्या विरोधात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता ज्योती वि. देशमुख यांनी दिला आहे.

ग्रामपंचायत लखमापुर हद्दीमध्ये गट क्र. 236 च्या एकूण 12 हेक्टर क्षेत्रामध्ये कारखाना केमिकल प्रकल्प, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होणारा प्रकल्प प्रस्तावित असल्याने प्रांत अधिकारी व लखमापूर ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमामणपत्र न देण्याबाबत गावच्या वतीने निवेदन दिले आहे. पूर्वी गावचे महसुली हद्दीत जे प्रकल्प आले आहे त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये गावाला सर्व प्रकारच्या प्रदूषणला सामोरे जावे लागत आहे. अस्तित्वात असलेल्या प्रकल्पापासून होणार्‍या प्रदुषणामुळे गावातील लोक विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत आहे. प्रस्तावित कारखान्याचे उत्पादन सुरु झाल्यावर त्यावर उत्पादित माल तयार करुन त्यातून बाहेर पडणारे रसायनमिश्रीत पाणी गट क्र. 236 च्या 12 हेक्टर क्षेत्रामध्ये खोलवर जिरेल. लखमापूर गावाला ज्या विहिरीतून सार्वजनिक पाणीपुरवठा केला जातो. त्यालगतच गट क्र. 236 व विहिरीचा परिसर या दोघांचे मिळून जमिनीचा संयुक्त असा बांध आहे. कारखान्यामधून प्रक्रिया करुन उरलेले खराब रसायन मिश्रीत पाणी जमिनीमध्ये जिरल्यामुळे ते पाणी गावाच्या सार्वजनिक विहीरीत उतरुन ते पाणी दूषित होऊन गावातील नागरिकांना प्यावे लागेल.

सदरचे पाणी भविष्यामध्ये दूषित झाल्यास गावाला पिण्यायोग्य पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. गावातील गट या क्षेत्रातील जमिनी लगतच्या बाजूने अनेक शेतकर्‍यांच्या विहिरी आहेत. त्या विहिरींना देखील हेच कारखान्यातून निघणारे दूषित पाणी उतरेल व पिण्याचे पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. गोरगरीब शेतकर्‍यांच्या विहिरींचे पाणी दूषित झाल्यास शेती पिके घेणे मुश्किल होईल व शेतकरी देशोधडीस लागतील. शेतकर्‍यांच्या जमिनी नापीक होऊन त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येईल, यामुळे ग्रामपंचायतीला दि. 7 जून 2022 रोजी तर दिंडोरीचे उपविभागीय अधिकार्‍यांना दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी निवेदन देवून हरकत घेतली असतांना सदरील कंपनीचे काम झपाट्याने सुरु झाले आहे. काम पूर्ण झाल्यावर प्रक्रियाही सुरु होईल. त्यामुळे निष्पाप लोकांना त्रास होणार असल्याने त्याविरुध्द जनआंदोलन उभे करणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या ज्योती देशमुख यांनी व्यक्त केले आहे. हरकत घेतली असतांना गावाला विश्वासात न घेता महसूल व ग्रामपंचायत विभागाने बांधकाम परवानगी कोणत्या नियमाखाली दिली? गावातील सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असतांना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन निष्पाप नागरिकांच्या जिवीताशी खेळण्याचा हा प्रकार आहे. गावच्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून हा कोणता विकास ग्रामपंचायतीकडून चालला आहे? असा सवाल उपस्थित करुन त्या कामाला त्वरित स्थगिती द्यावी, अन्यथा लवकरच मोठ्या प्रमाणात गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या ज्योती देशमुख यांनी दिला आहे.

हे आहे मुख्य कारण

गट क्र. 236 या जमिनीचा उतार हा गावचे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे जवळील नाल्याकडे आहे. हा नाला प्रस्तावित केमिकल कंपनीच्या लगत आहे. सदर नाला हा विविध प्रकारच्या शेतजमिनी ओलांडून कादवा नदीपात्राला जाऊन मिळतो. नदीमध्ये दूषित पाणी जाणार आहे. गावची सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीजवळील नाल्यामधून ज्या – ज्या शेतकर्‍यांच्या जमिनीमार्गे प्रस्तावित कारखान्याचे दूषित पाणी जाणार आहे त्या शेतकर्‍यांच्या बोअरवेल व विहिरींना पाणी पाझरूण ते विहिरींना मिळेल व त्यानंतर गावाचे दक्षिण बाजूला कादवा नदीमध्ये पाणी जाईल.

First Published on: February 25, 2023 11:42 AM
Exit mobile version