नाशिक भाजपामध्ये का झाला आमदार-नगरसेवकांत राडा?

नाशिक भाजपामध्ये का झाला आमदार-नगरसेवकांत राडा?

सीमा हिरे आणि मुकेश शहाणे यांच्यातील चकमकीची होणार चौकशी.

भारतीय जनता पार्टीची ओळख आता ‘राडा पार्टी’ म्हणून होत असून, अमळनेर आणि त्यानंतर नाशिकमधील घटनेमुळे पार्टीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. या प्रकरणांमध्ये वरिष्ठांनी लक्ष घातले असून, हे वाद भाजपबाह्य शक्तीने तर घडवून आणले नाहीत ना, या दृष्टीने आता चौकशी सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अमळनेरच्या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यात तुफान हाणामारी झाली. यात डॉ. पाटील यांच्या नाकाचे हाड मोडले. या प्रकरणी त्यांनी वाघ समर्थक तथा भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार, देवा लांडगे, एजाज बागवान व संदीप वाघ यांच्याविरुध्द पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी नाशिकमध्ये भाजप आमदार सीमा हिरे आणि नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दररोज अशी प्रकरणे पुढे येत असल्याने त्यामागे विरोधी पक्षाचा हात असावा अशी शंका पालकमंत्र्यांसह पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने आता दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू झाली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले.

या गोष्टींची होणार चौकशी

का झाला हिरे-शहाणेंमध्ये राडा?

नगरसेवक मुकेश शहाणे हे माजी आमदार वसंत गिते यांचे खंदे समर्थक. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शहाणे हे अपूर्व हिरे यांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी हिरेंबरोबर सलोखा करत निवडणूक लढवली आणि यात ते निवडून आले. त्यानंतर भारतीय जनता युवा मार्चाच्या अध्यक्षपदावरुन सीमा हिरे आणि शहाणे यांच्यात वाद झाला. यावेळी शहाणे यांनी अंकुश वराडे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. सीमा हिरे यांनी किरण गाडेंसाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यावेळी हिरे आणि शहाणेंमध्ये जोरदार वाद झाले होते. अपूर्व हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचा सहारा घेतल्यानंतर आता ते पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरेंच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या दोन्ही हिरेंमध्ये कमालीची स्पर्धा आहे. त्याचेच पडसाद शहाणे – हिरे वादात झाल्याची चर्चा आहे. शहाणेंच्या प्रभागात आमदार सीमा हिरे या परस्पर प्रचार करत असल्याचा दावा करत शहाणेंनी वादाला तोंड फोडले. मनसेतून आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नय,े असे सीमा हिरे यांनी सुनावताच शहाणेंनी रुद्रावतार धारण केला. हा वाद केवळ प्रभागापुरताच मर्यादित न ठेवता ते एका खासगी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिरले आणि तेथेही सीमा हिरेंना जाब विचारला. यावेळी अंतर्गत धुसफुसीला उकळी फुटली. पक्षनिष्ठा शिकविणार्‍या सीमा हिरे आणि त्यांच्या कुटूंबीयांनी भाजपच्या स्वाती भामरे यांच्या विरोधात महापालिका निवडणूकीत प्रचार का केला, असा जाबही यावेळी विचारण्यात आला. बॉश कंपनीतील चोरी आणि बनावट साहित्य विक्रीचे प्रकरण असो वा अन्य काही प्रकरणे यात शहाणे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे आता हिरे आणि शहाणे वाद कुठल्या टोकापर्यंत जातो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

First Published on: April 12, 2019 6:12 PM
Exit mobile version