लॉन्सचे नियमबाह्य बांधकाम चालकांनी स्वत:हून हटवले

लॉन्सचे नियमबाह्य बांधकाम चालकांनी स्वत:हून हटवले

महापालिकेच्या नगररचना विभागाने नव्याने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ११० मंगल कार्यालये व लॉन्स अनधिकृत असल्याचे आढळून आले असून, त्यांना महापालिकेच्या नगरविकास विभागाने अंतिम नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ६९ मंगल कार्यालये आणि ४१ लॉन्सचा समावेश आहे. पंचवटी विभागातील तीन लॉन्सचालकांनी सामासिक अंतरातील बांधकाम स्वत:हून हटवले आहे.

या अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांच्या फाईल्स थेट अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित मंगल कार्यालये आणि लॉन्सवर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे. शहरातील अनधिकृत मंगल कार्यालये, लॉन्सविरोधात वर्षभरापूर्वी स्थगित करण्यात आलेली महापालिकेची कारवाई आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुन्हा एकदा सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रात लॉन्स व मंगल कार्यालयांची परवानगी घेण्यासाठी विशेष नियमावली नवीन विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट करण्यात आली आहे; परंतु नियम धाब्यावर बसवित शहर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉन्स आणि मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. अनेक लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये अनधिकृतपणे बांधकाम केलेले असून, त्याबाबतच्या तक्रारी नगररचना विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने गेल्या वर्षी शहरातील सर्व लॉन्स व मंगल कार्यालयांचे विभागनिहाय सर्वेक्षण केले होते. यामध्ये १६७ अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालये आढळून आली होती. नगररचना विभागाने अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्सचालकांना नोटिसाही बजावल्या होत्या. त्यानुसार बहुतांश मंगल कार्यालये, लॉन्सचालकांनी आपापली अनधिकृत बांधकामे स्वत:हून हटविली. त्यानंतर उद्भवलेल्या गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणानंतर अनधिकृत मंगल कार्यालयांविरोधातील महापालिकेची मोहीम थंडावली होती. परंतु, आयुक्त गमे यांनी पुन्हा ही अनधिकृत मंगल कार्यालये आणि लॉन्सविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांनी फेरसर्वेक्षण केले होते. नगररचना विभागाने नव्याने केलेल्या फेरसर्वेक्षणात १६१ मंगल कार्यालये आणि लॉन्स आढळले आहेत. त्यात ७४ मंगलकार्यालये आणि ८७ लॉन्सचा समावेश होता. त्यापैकी पाच मंगल कार्यालये आणि ४६ लॉन्सधारकांनी महापालिकेकडून परवानगी घेतल्याचे समोर आले. त्यामुळे ६९ मंगल कार्यालये आणि ४१ लान्सधारकांनी अद्यापही परवानगी घेतलेली नसल्याने त्यांच्यावर आता अंतिम कारवाई सुरू केली आहे.

या सर्वांना अंतिम नोटिसा बजावण्याचे काम नगररचना विभागाने सुरू केले आहे. नगररचना विभागाने ही ११० अनधिकृत मंगल कार्यालये आणि लॉन्सला अंतिम नोटीस बजावली असून, या नोटिसांना समाधानकारक उत्तर आले नाही किंवा संबंधित मालकाने दंडात्मक शुल्क भरून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही, तर त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. त्यासाठी नगररचना विभागाने या सर्व ११० अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांच्या फायली अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठविल्या आहेत. नोटीस देताना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तीन लॉन्सचालकांनी अतिक्रमित बांधकाम हटवले आहे. यात पंचवटीतील आठवण लॉन्स, मिराव्दार लॉन्स आणि विठ्ठल रुक्मिणी लॉन्सचा समावेश आहे.

First Published on: June 14, 2019 9:07 AM
Exit mobile version