पांजरापोळ ट्रस्टचे बिल्डर्ससोबत लागेबांधे?; जमिनीवरून भाजपात दोन गट

पांजरापोळ ट्रस्टचे बिल्डर्ससोबत लागेबांधे?; जमिनीवरून भाजपात दोन गट

नाशिक : नाशिकच्या विकासाआड येत पांंजरापोळची जागा औद्योगिक विकासासाठी देण्यास विरोध करणारे पर्यावरणाच्या मुद्द्या आडून मलिदा खात आहेत. पांजरापोळ ट्रस्टचे बांधकाम व्यावसायिकांशी लागेबांधे असून, त्यांच्याशी करार झाल्याचा खळबळजनक आरोप भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता प्रदीप पेशकार यांनी केला. गोवंशाच्या संख्येचे स्वरूप पाहून कायद्याचे पालन करून औद्योगिक कारणासाठी जागा अधिग्रहीत करावी, ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक येथील पांजरापोळ अंतर्गत असलेली 500 हेक्टरपेक्षा जास्त जागा ही औद्योगिक कारणासाठी अधिकृत करता येईल का, याचा विचार शासन स्तरावर होत आहे. यासंदर्भात उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. मात्र, पांजरापोळची जागा एमआयडीसीसाठी अधिग्रहीत करण्यास खुद्द भाजपच्याच पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला असताना पक्षाने पत्रकार परिषद घेत आरे कारशेडच्या धर्तीवर ही जागा अधिग्रहीत करण्याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केल्याने पक्षात यावरून गटतट पडल्याचे दिसून आले.

भाजप प्रदेश प्रवक्ते पेशकार यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. एकीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावर शासन काहीच करत नाही, असा उर बडवणारे दुसर्‍या बाजूला उद्योग येणार म्हटले की पर्यावरणाचा मुद्दा समोर करून त्याआडून मलिदा मिळतो का या संधीचा शोध घेत असल्याचा आरोपही पेशकार यांनी केला. अधिग्रणासाठी अभ्यास समिती नियुक्त केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मी पक्षाचा प्रवक्ता आमदारांचा नाही

भाजपची अधिकृत भूमिका जागा अधिग्रहणाच्या बाजूने असली तरी याच पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांनी मात्र या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. याबाबत पेशकार यांना विचारले असता, आमदारांनी विकासाला विरोध केला नसून झाडे तोडण्यास त्यांचा विरोध आहे. तसेच, मी आमदारांचा नव्हे तर पक्षाचा प्रवक्ता असल्याचे सांगत पेशकारांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

First Published on: March 23, 2023 12:54 PM
Exit mobile version