सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेविरोधात पालकांचे आंदोलन

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेविरोधात पालकांचे आंदोलन

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरु असताना शंभर टक्के शुल्क भरण्याचा आग्रह धरणार्‍या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विरोधात पालकांनी शुक्रवारी (दि.25) आंदोलन केले. पोलिसांच्या माध्यस्थिनंतर शाळेच्या प्रशासनाने पालकांशी चर्चा केली असता केवळ 3 हजार रुपयांची देवू केलेली सवलत पालकांनी अमान्य केली. त्यामुळे शाळेविरोधात आंदोलन यापुढेही सुरुच राहणार असल्याचे पालकांनी यावेळी सांगितले.

अशोका मार्गावरील जयदीप नगर येथे सेक्रेड हार्ट कॉन्हेंट शाळा आहे. शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण शाळेने बंद केले आहे. याविषयी पालकांनी विचारणा केली असता शाळेने शुल्क भरण्याचा आग्रह धरला. पालकांनी या शाळेकडे 50 टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे. संगणक, लॅब, लायब्ररी आदी मुलभूत सुविधांचा वापर विद्यार्थी करत नसल्याने फक्त शिकवणी (ट्युशन) शुल्क घेण्याचा आग्रह पालकांनी केला. पालकांची ही मागणी शाळेला मान्य नसून त्यांनी विद्यार्थ्यांची अडवणूक सुरु केली आहे. ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवणे, शुल्क न भरलेल्या सुमारे 736 विद्यार्थ्यांना ऑफलाईन व्हिडीओ पाठवले जातात. झूम अ‍ॅपवर पाऊणतास शिक्षण दिले जाते. त्यात पहिली 15 मिनिटे हजेरी घेण्यात जातात. उर्वरित वेळेत एक विषय शिकवला जातो. अनेक विद्यार्थ्यांना विषय व्यवस्थितरित्या समजत नाही. शाळेने झूम अ‍ॅप विकत घेण्याची आवश्यकता असताना फक्त मोफत वेळेतच शिकवले जात आहे. अशा परिस्थितीत शाळा पालकांकडून पूर्ण शूल्क भरण्याचा आग्रह का धरते? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. तसेच कोरोनाच्या काळात अनेक पालकांचा रोजगार गेला, व्यवसाय बुडाल्याने पालक आर्थिक अडचणीत आहेत. तरिही 50 टक्के शुल्क भरण्याची त्यांची तयारी आहे. परंतु, शाळा त्याला मान्यता देत नसल्याने हा विषय आता थेट शिक्षणमंत्र्यांपर्यंत घेवून जाण्याचा निर्णय पालकांनी घेतला. तसेच येत्या काळात पालक पुन्हा शाळेसमोर मोर्चा घेवून येणार असल्याचे पालकांनी म्हटले आहे.

शाळेने अवघे 3 हजार रुपयांची सवलत देवू केली आहे. परंतु, पालकांना ती मान्य नसून आंदोलन यापुढे सुरुच ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. अन्य पालकांनाही यात सहभागी करुन घेतले जाणार आहे.
– दिनेश हिरे, पालक प्रतिनिधी

First Published on: June 25, 2021 4:00 PM
Exit mobile version