कनिष्ठ सहाय्यकासह मुख्याध्यापकाची रोखली वेतनवाढ

कनिष्ठ सहाय्यकासह मुख्याध्यापकाची रोखली वेतनवाढ

प्रातिनिधिक फोटो

प्राथमिक शिक्षिकेचा रजा अर्ज विलंबाने सादर करुनही त्यास विलंब करणार्‍या जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ सहाय्यकासह शाळेच्या मुख्याध्यापकाची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तसेच निफाड येथील गट विकास अधिकार्‍यांना सक्तीची नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी दिले आहेत.

ओझर (ता.निफाड) येथील प्राथमिक शाळेतील तत्कालिन शिक्षिका वैद्यकीय कारणास्तव सन 2015 मध्ये 192 दिवस रजेवर होत्या. त्यांचा रजा मंजुरीचा प्रस्ताव निफाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने विलंबाने 2017 मध्ये मंजुरीस्तव सादर केला होता. याप्रकरणी निफाड पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यक हेमलता गायकवाड यांना नोटीस बजावण्यात आली होती. याप्रकरणी दोषी आढळयाने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाप्रमाणे त्यांची एक वेतनवाढ बंद केली आहे.

त्याचप्रमाणे सदर शिक्षिकांची रजा 90 दिवसांपेक्षा जास्त असल्याने नियमानुसार वैद्यकीय मंडळाकडे त्यांना तपासणीसाठी पाठविणे आवश्यक होते. मात्र, शाळेचे तत्कालिन मुख्याध्यापक भाऊसाहेब पवार यांनी त्यांना परस्पर हजर करुन घेतल्याने त्यांचीही एक वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप यांचेही त्यांच्या अधिनस्त कर्मचार्‍यांच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे सिध्द झाल्याने त्यांनाही सक्त ताकीद देण्यात आली असून त्यांच्या मुळसेवा पुस्तकात यांची नोंद घेण्याचे निर्देश दिलेे आहेत.

First Published on: July 16, 2019 3:37 PM
Exit mobile version