अडकलेल्या नाशिककरांचा मुक्काम काही दिवस प. बंगालमध्येच

अडकलेल्या नाशिककरांचा मुक्काम काही दिवस प. बंगालमध्येच

पश्चिम बंगालला अडकलेले नाशिकचे रहिवासी

पश्चिम बंगालमध्ये अडकलेल्या २०३ नाशिककरांसाठी तेथील जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन त्यांना फूडपॅकेटची व्यवस्था केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. दळणवळणाच्या सर्वच सुविधा बंद असल्याने या नाशिककरांना तातडीने नाशिकमध्ये आनण्यास मात्र त्यांनी हतबलता दर्शविली.
जुने नाशिक परिसरातील रहिवाशी पश्चिम बंगालमधील एका दर्ग्याच्या दर्शनासाठी नाशिकमधून १३ मार्चला निघाले होते. त्यात सुमारे २५ लहान मुले, ६० ज्येष्ठ नागरिक आणि सुमारे १०० महिलांचा समावेश आहे. धार्मिक विधी आटोपून ही मंडळी २३ मार्चला परतणार होती. मात्र त्याच काळात रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने त्यांना आता बाहेर पडणे दुरापास्त होत आहे. खासगी वाहने देखील बंद असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. सध्या तेथील खासदार मौसम नूर यांच्या बंगल्यात काही नागरिक थांबले आहेत. तर पंडवा गावातील वेगवेगळ्या घरांमध्ये प्रत्येकी चार ते पाच जण वास्तव्यास आहे. मात्र करोनाचे संकट अधिक गडद होत असल्याने आता गावकर्‍यांनीही त्यांच्या राहण्यावर आक्षेप घेणे सुरु केले आहे. यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पश्चिम बंगालमधील संबंधित जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन काही दिवस नाशिककरांची व्यवस्था करण्याबाबत विनंती केली. दळणवळणाची सर्वच साधने बंद आहेत. त्यामुळेे या नागरिकांना नाशिकमध्ये तातडीने आनणे शक्य नसल्याचे सांगत या प्रवाशांनी अजून काही दिवस आहे त्याच ठिकाणी रहावे असेही जिल्हाधिकार्‍यांनी सूचित केले. खासदार मौसम नूर यांच्याशीही जिल्हाधिकार्‍यांनी चर्चा केली असून त्यांनी त्यांच्या निवासस्थानी अजून काही दिवस अडकलेल्या लोकांना राहण्यास परवानगी दिल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
First Published on: March 27, 2020 12:42 PM
Exit mobile version