पेट्रोल मनाई : विनाहेल्मेट दुचालकाने केली पोलिसाशी अरेरावी

पेट्रोल मनाई : विनाहेल्मेट दुचालकाने केली पोलिसाशी अरेरावी

विनाहेल्मेट दुचाकीचालकास पेट्रोल देण्यास पोलिसांनी मनाई केल्याने चालकाने पोलिसाशी हुज्जत घालत अरेरावी तसेच हात उगारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीचालक सोनार यास ताब्यात घेत कारवाईचा बडगा उचलला आहे. ही घटना गुरुवारी (दि.१९) सकाळी १० वाजता नवीन नाशिकच्या खुटवड नगर येथील पेट्रोल पंपावर घडली.

शहरात १५ ऑगस्टपासून सुरु झालेल्या नो हल्मेट, नो पेट्रोल मोहिमेला नाशिककरांकडून वेगवेगळ्या पद्धतीने हरताळ फासला जात आहे. पेट्रोल पपांवर वाद-विवाद व हाणामारीचे प्रकार घडत असल्याने या मोहिमेला पेट्रोल पंपचालक असोसिएशन बरोबरच सर्वसामान्य नागरिकांकडूनही विरोध होऊ लागल्याने या मोहिमेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. नवीन नाशिकच्या खुटवड नगर येथील पेट्रोल पंपावर गुरुवारी विनाहेल्मेट दुचाकीचालक पेट्रोल भरण्यास आला. त्यावेळी दुचाकीचालकाला पोलिसांनी विनाहेल्मेट पेट्रोल मिळणार नसल्याने रांगेबाहेर निघण्यास सांगितले. त्यातून राग अनावर झाल्याने दुचाकीचालकाने पोलिसाशी हुज्जत घालत अरेरावी तसेच हात उगारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीचालक सोनार यास ताब्यात घेत कारवाईचा बडगा उचलला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी पेट्रोल पंपाला भेट दिली.

मोहिमेच्या सुरुवातीपासूनच ही मोहीम कितपत यशस्वी होईल, याविषयी जाणकारांकडून शंका व्यक्त करण्यात येत होती. नियमांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक दुचाकीचालक पेट्रोल पंपवर हेल्मेटचा जुगाड करुन पेट्रोल भरून घेत असल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याच्या सूचना नाशिक पोलिसांना दिल्या आहेत. ही मोहीम राबवितांना घडणार्‍या घटनांमुळे पेट्रोलपंप चालकांची मानसिकता सकारात्मक राहिलेली नाही. त्यामुळे ही मोहिम अल्पजीवी ठरते का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

First Published on: August 19, 2021 4:18 PM
Exit mobile version