सुसज्ज शाळा पाडण्याचा घाट

सुसज्ज शाळा पाडण्याचा घाट

इगतपुरी येथील १०० वर्षांपासून सुरू असलेली शाळा.

इगतपुरी १९०६ साली स्थापन जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा भाडे तत्वावर सुमारे १०७ वर्षापासून ज्या इमारतीत भरवली जाते; ती इमारत खासगी बिल्डरने पाडण्यासाठी पंचायत समितीच्या (इवद) विभागाला हाताशी धरून पाडण्याचा घाट घातल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे ही शाळा वाचवण्यासाठी स्थानिक मुस्लीम संघटनेचे नेते व जिल्हा परिषद सदस्य सरसावले आहेत.

या शाळेत सुमारे दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची ही जागा १०६ वर्षापासून जुनी असून आजही इमारत सुरक्षित आहे. जागेचे वाढते भाव पाहता सदर जागा मालकाने मुलांच्या शिक्षणावर गदा आणून इमारत पाडून तेथे भव्य काँप्लेक्स उभारण्यासाठी शाळा इमारत पाडण्याचा घाट घातला. याकरता जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती विभागातील इतर दळणवळण विभाग व अन्य संबधितांना हाताशी धरून हा प्रकार केल्याने संबधित विभागाने सदर शालेय इमारतीला दोन महिनेपूर्वी तीन वेळा निर्लेखीत इमारत घोषीत करून पत्र व्यवहार केला. मात्र, सदर वृत्त पालकांना समजताच राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष वसीम सैयद यांच्याकडे धाव घेत सर्व प्रकरण उघड केले. सैयद यांनी हा प्रकार जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव यांना सांगितला. जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासह गटविकासधिकारी किरण जाधव व इतर दळणवळण विभागाचे उप अभियंता सु. म. निळे यांच्याशी याविषयी चर्चा केली. शिष्टमंडळाने प्रत्यक्षात शालेय इमारतीची पाहणी केली असता सदरची इमारत ही धोकादायक नसून आणखी २० वर्ष टिकेल, असे सांगितले. जाधव व सैयद यांनी संबधीत अधिकार्‍यांना धारेवर धरले. याबाबत जिल्हा मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे माहिती कळवली आहे. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष इफ्तेहार शेख, मुनाफ शेख, अहमद शेख, निजाम खान, मंसुर खान, आबिद खान, इम्रान खान, एजाज शेख, जब्बार शेख, आयुब शेख, अल्ताफ शेख, आयाज शेख, सादिक शेख, मोसिन सैयद, वसिम खान आदींसह पालक उपस्थित होते.

शाळा बंद करण्याचा कट

जमीन मालकाला या ठिकाणी मोठी इमारत उभी करायची असल्याने ही शाळा बंद करण्याचा कट रचला आहे. यासाठी तीव्र आंदोलन छेडू. – वसिम सैयद, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शासनानेच शाळा ताब्यात घ्यावी

शासनस्तरावर ही शाळा ताब्यात घेवून इमारतीला कायम करावे. व मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला आवर घालावा. – फिरोज पठाण, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

First Published on: July 3, 2019 9:15 AM
Exit mobile version