पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कांद्याचे शहर म्हणून ओळख असणार्‍या पिंपळगाव बसवंत येथे भाजपचे स्टार प्रचारक तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) सकाळी ११ ला जाहीर सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन यांसह उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते संबोधित करणार आहेत.

नवीन बाजार समितीच्या जवळील (जोपूळ रोडवर) ४ लाख चौरस फूट जागेत भव्य मंडप उभारण्यात आला असून सभास्थळी सुरक्षेच्यादृष्टीने व्हीव्हीआयपी व्यवस्था करण्यात आली आहे. एक किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घातली असून, बाजार समितीसमोरील पटांगणात तीन, तर बाजार समितीमागे एक असे चार हेलिपॅड्स तयार करण्यात आले आहेत. वाहनांची तपासणी करूनच सभास्थळी प्रवेश दिला जाणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तीन हजार पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची वेळ सकाळी ११ ची असली तरी तत्पूर्वी स्थानिक नेत्यांची भाषणे होतील. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार अनिल कदम, डॉ. राहुल आहेर यांसह युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार यांचीही भाषणे होतील.

आसन व्यवस्था अशी…

चार लाख चौरस फूट क्षमतेच्या या मैदानावर ५० हजार खुर्चा टाकण्यात येणार आहेत. तसेच पुढील मान्यवरांसाठी सोपे ठेवण्यात आले आहेत. सभेसाठी होणार्‍या गर्दीचा विचार करता सभामंडपापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. सोमवारी सकाळपासून पिंपळगाव-चिंचखेड चौफुली ते बाजार समिती रोड व जोपूळ रोड रस्त्यास नाकाबंदी करण्यात आली आहे.

एक लाख लिटर पाण्याची व्यवस्था

मोदींच्या सभेसाठी उपस्थित राहणार्‍या नागरिकांची तहान भागवण्यासाठी एक लाख लिटर शुद्ध व थंडगार पाण्याची व्यवस्था केली आहे. सभामंडपात ५० तर, मंडपाबाहेर ३० स्टॉल्स असतील.

३ हजार पोलिसांचा ताफा

सभेच्या सुरक्षेसाठी ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. सभास्थळी नागरिकांना बसण्याचे नियोजन व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळापासून दीड किलोमीटरपर्यंत साध्या वेशातील पोलीस गस्त ठेवणार असून ३ हजार पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

First Published on: April 21, 2019 11:59 PM
Exit mobile version