रिक्षात सापडली ८४ लाखांची कॅश

रिक्षात सापडली ८४ लाखांची कॅश

प्रातिनिधिक फोटो

अहमदनगर येथील सावेडी उपनगर परिसरात वैदुवाडी येथे रिक्षामध्ये तब्बल ८४ लाखांची रोकड पोलिसांनी पाठलाग करून पकडली. अधिक तपासासाठी ही रक्कम आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. शनिवारी (दि. ३०) सायंकाळी वैदुवाडी भागात मोठी रक्कम येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहर पोलिस उपअधीक्षक यांचे पथक वैदुवाडी भागात गेले होते. यावेळी एक संशयित रिक्षा त्यांना आढळून आली. पोलिसांना पाहताच रिक्षाचालकाने रिक्षाचा वेग वाढवला. रिक्षाचा वेग वाढल्याने पोलिस पथकाचा संशय बळावला आणि पथकाने रिक्षाचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला. वैदुवाडीत रिक्षा रोखून तपासणी केली असता, त्यात तब्बल ८४ लाखांची रोकड आढळून आली. ऐन निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच आयकर विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सापडलेली रक्कम आयकर अधिकार्‍यांनी ताब्यात घेतली. पुढील चौकशी सुरू आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

First Published on: March 30, 2019 9:19 PM
Exit mobile version