‘ओझरखेड’चे पाणी सोडणार पोलीस बंदोबस्तात

‘ओझरखेड’चे पाणी सोडणार पोलीस बंदोबस्तात

शेतकऱ्यांच्या बैठकीत

ओझरखेड कालव्याचे पाणी न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या वाहेगावसाळ येथील शेतकर्‍यांच्या निर्णयामुळे शासकीय यंत्रणा हादरली आहे. वाहेगावसाळच्या शेतकर्‍यांची प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी रविवारी (७ एप्रिल) सायंकाळी उशिरा बैठक घेऊन शेतकर्‍यांची समजूत काढत कालव्यास एक दिवस पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे. हे पाणी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे.

ओझरखेड कालव्याचे सबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाणी चोरी करणार्‍यांवर जोपर्यंत कार्यवाही करीत नाही, तोपर्यंत पाणी पिंपळद गावच्या पुढे जाणार नसल्याचे वाहेगावसाळच्या शेतकर्‍यांनी सांगितले. निफाड तालुक्यातील टाकळी, सावरगाव, खडकमाळेगाव येथील शेतकरी ओझरखेड कालव्यातील पाण्याची मोठी चोरी करीत आहे. हि पाणी चोरी थांबवण्यासाठी सबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस यंत्रणा यांनी पाहरा दिला तर पाणी वाहेगावसाळपर्यंत नक्कीच पोहचेल, असे शेतकर्‍यांनी पटवून सांगितले. शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकल्यावर प्रांत भंडारे यांनी जिल्हाधिकारी संजय मांढरे, उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी फोनवर बोलून कालव्यावरील पाणी चोरी टाळण्यासाठी महसूल, पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. यामुळे ओझरखेड कालव्याचे पाणी वाहेगावसाळपर्यंत पोहचण्याची आशा लाभार्थी शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. बैठकीस बाजार समिती सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अधिकारी राकेश गुजरे, विलास ढोमसे, मोहन शर्मा, अशोक भोसले, मनोज शिंदे, अरुण न्याहारकर, निवृत्ती न्याहारकर, सुनील न्याहारकर, तुकाराम खैरे, निवृत्ती न्याहारकर, अमोल रसाळ, गोरख जाधव, अरुण देवढे, बाबुराव गांगुर्डे, रतन गांगुर्डे उपस्थित होते.

डोंगळे निफाडकरांचे, त्रास मात्र चांदवडकरांना

निफाड तालुक्यातील टाकळी, सावरगाव खडकमाळेगाव आदी परिसरात ओझरखेड कालव्यातून मोठ्या प्रमाणात डोंगळे टाकून पाणी उपसा केला जातो. परिणामी पुढे जाणार्‍या पाण्याचा प्रवाहाची गती कमी झाल्याने कालव्याचे शेवटचे टोक असलेल्या वाहेगावसाळपर्यंत पाणी पोहोचतच नसल्याने डोंगळे निफाडकरांचे, त्रास मात्र चांदवडकरांना असे म्हणण्याची वेळ चांदवड तालुक्यावर आली आहे.

First Published on: April 9, 2019 9:15 AM
Exit mobile version