उड्डाणपूलाचे साहित्य भंगारात; रंगेहात पकडूनही पोलिसांकडून सुटका

उड्डाणपूलाचे साहित्य भंगारात; रंगेहात पकडूनही पोलिसांकडून सुटका

रंगेहात पकडून नंतर या चोरट्याला पोलिसांनी सोडून दिले.

मुंबई-आग्रा महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामासाठीचे लोखंडी साहित्य भंगारात विकले जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. हे साहित्य चोरुन ते भंगार दुकानात विकताना रंगेहात पकडलेल्या एकाला पोलिसांनी कारवाईऐवजी मोकळे सोडून दिल्याने, पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पंचवटीतून जाणाऱ्या महामार्गावर सध्या उड्डाणपूलासह अंडरपासचे काम सुरू आहे. या कामासाठी रासबिहारी चौफुलीजवळ मोठ्या प्रमाणावर साहित्य ठेवलेले आहे. त्यातील लोखंडी गज व तारा अशा साधारण १५ किलो लोखंडाची चोरी होत असल्याचे राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या वाहनचालकाच्या निदर्शनास आले. त्याने कामावरील सहकाऱ्यांना सोबत नेत दुचाकीवरील दोन पोलिसांच्या मदतीने भंगार चोरून पळत असलेल्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला. हॉटेल जत्रालगत असलेल्या एका भंगार दुकानात हा व्यक्ती चोरी केलेले साहित्य विक्रीसाठी पोहोचत असतानाच, त्याला पोलिसांनी पकडले. सर्वांनी त्याला चोप दिला. या वेळी चोरटा हा भंगार खरेदी करणाऱा असल्याची बतावणी करत होता. महामार्ग प्राधिकरणाच्या वाहनचालकाने त्याला चोरी करताना स्वतः पाहिले असल्याने त्याला आडगाव पोलिसांत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही घटना फारशी गंभीर नसल्याचे सांगत चोप देत घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी कठोर कारवाई करण्याऐवजी त्याला मोकळे सोडून दिले.

गेल्या काही दिवसांपासून के. के. वाघ ते जत्रा चौफुलीपर्यंत उड्डाणपुलाचे सुरू आहे. येथील लोखंडी साहित्यावर चोरट्यांची नजर असल्याने, रोजच लहानमोठ्या चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे संबंधित सर्वच कर्मचारी व अधिकारी त्रस्त आहेत. त्यात आता रंगेहात पकडून देऊनही पोलिसांनी घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेमुळे स्थानिकांनीही संताप व्यक्त केला. पोलिसांची भूमिकाच चोरट्यांना बळ देत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी भंगाराचे साहित्य विकत घेणाऱ्या दुकानांवरदेखील कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

First Published on: June 13, 2019 10:02 PM
Exit mobile version