जळगाव, रावेरसाठी आज मतदान

जळगाव, रावेरसाठी आज मतदान

रावेर, जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (२३ एप्रिल) मतदान होणार आहे. यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी ईव्हीएम मशीन, व्हीव्ही पॅटसह पोलीस बंदोबस्त रवाना झाले आहे. शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून मतदार व कर्मचार्‍यांनी केंद्रांवर मोबाईलचा वापर करू नये, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मुख्यतः भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होणार आहे.

रावेरमध्ये मुख्यतः भाजपच्या रक्षा खडसे, काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील व जळगावमध्ये भाजपचे आमदार उन्मेष पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत होणार आहे. या दोन्ही लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ होणार आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील ३,६१७ मतदार केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ होणार आहे. यासाठी सोमवारी (२२ एप्रिल) सकाळी आठ वाजेपासून मतदान यंत्र व इतर साहित्य कर्मचार्‍याना वितरित करण्यात आले. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी एकलव्य क्रीडा संकुलाच्या प्रांगणात साहित्य वितरित झाल्यावर उपस्थित कर्मचार्‍यानी यंत्रांची तपासणी केली. त्याच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर कर्मचारी, पोलिसांसह बसेस् व इतर वाहनांनी मतदान केंद्रांकडे रवाना झाले.

First Published on: April 22, 2019 11:59 PM
Exit mobile version