मोक्याच्या क्षणी नाशिकलाही धडाडणार राज ठाकरेंची तोफ; २६ ला सभा

मोक्याच्या क्षणी नाशिकलाही धडाडणार राज ठाकरेंची तोफ; २६ ला सभा

राज ठाकरे

राज्यभरात आपल्या आक्रमक शैलीत पंतप्रधान मोदी व शहांविरुद्ध रान पेटविणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची नाशिकमध्ये २६ एप्रिलला जाहीर सभा होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात होत असलेल्या या सभेवरच आघाडीच्या उमेदवाराचे काही प्रमाणात भवितव्य अवलंबून असल्याने, सर्वांचेच लक्ष सभेकडे लागून आहे.

शहरातील हुतात्मा कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब) शुक्रवारी, २६ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात होईल. राज ठाकरे हे त्यांच्या प्रत्येक प्रचारसभेत मोदी आणि शहांच्या आधीच्या आणि नंतरच्या भाषणाच्या क्लिप्स दाखवत, त्यांचा खोटेपणा उघड्यावर मांडत असल्याने, आघाडीला त्याचा थेट फायदा होणार असल्याचे सांगितले जाते आहे. कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज यांची जाहीर सभा होत असल्याने, सर्वांचेच त्याकडे लक्ष लागून आहे. या सभेला मनसेच्या राज्य पातळीवरील पदाधिकार्‍यांसह स्थानिक नेते, पदाधिकारी व मनसैनिकांची मोठी उपस्थिती राहणार आहे. राज यांच्या आक्रमक शैलीतील भाषणाने प्रभावित होऊनच नाशिककरांनी महापालिकेची सत्ता आणि विधानसभेसाठीही मनसेच्या उमेदवारांना संधी दिली होती. त्यामुळे हे भाषणदेखील तितकीच किमया साधू शकेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा २७ एप्रिलला थंडावणार आहे. या मोक्याच्या क्षणीच राज यांची सभा होणार असल्याने सभेस उत्तर देण्यासाठी युतीकडे एकच दिवस शिल्लक राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संयुक्त सभा राज यांच्या सभेपुर्वीच म्हणजेच २४ एप्रिलला होणार आहे.

नियोजनासाठी पदाधिकार्‍यांची बैठक

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पदाधिकार्‍यांची बुधवारी, १७ एप्रिलला सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात जबाबदार्‍यांची सूत्रे पदाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आली. तसेच, सभेसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. गुरुवारी, १८ एप्रिलला जिल्हा स्तरावरील पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातून उपस्थिती

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला नाशिक शहर, जिल्ह्यासह मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार, दिंडोरी अशा विविध ठिकाणाहून मनसैनिकांची मोठी उपस्थिती राहणार आहे. त्यादृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. – अनिल मटाले, शहराध्यक्ष, मनसे

First Published on: April 17, 2019 9:00 PM
Exit mobile version