मोदींच्या ‘पाकिस्तानी भुता’वर राज ठाकरेंचा अचूक निशाणा!

मोदींच्या ‘पाकिस्तानी भुता’वर राज ठाकरेंचा अचूक निशाणा!

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि नांदेड येथे घेतलेल्या सभांची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात युद्ध सदृश परिस्थिती घडवून आणतील, हे राज ठाकरेंचे भाकित खरे ठरत आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्याचे खंडण केले जात नसल्याने पंतप्रधानांच्या प्रचारकी भाषणांतील मुद्यांची चिकित्सा केली जाऊ लागली आहे.

निवडणुका जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे भूत उभे केले आहे, राजकीय लाभासाठी शहीद जवानांचा आणि लष्कराचा वापर केला जात आहे. पण हे सारे पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करताना मोदींच्याच जुन्या आणि नव्या भाषणांचे संदर्भ पुरावे म्हणून राज ठाकरे देत आहेत. यामुळे मोदींचे दुटप्पी राजकारण उघडे पडत आहे.

आपल्या जिवाला धोका असल्याचे काही दिवसांपूर्वी मोदी सांगत होते, आता देश आपल्या हातात सुरक्षित असल्याचे सांगत सुटले आहेत. पंतप्रधानाच्या हातात हा देश सुरक्षित असता तर पुलवामात दहशतवादी घुसलेच कसे ? हाच सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुळात पुलवामा मध्ये दहशतवादी घुसखोरी करत असताना सुरक्षित हात कोठे गेले होत? या प्रश्नावर मोदीकडे उत्तर नाही. निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा घडवून आणण्यात आले आणि युध्द सदृश परिस्थिती निर्माण करून निवडणुकीच्या प्रचारात पाकिस्तानचे भूत नाचवले जात असल्याचा थेट आरोप राज ठाकरे यांनी करुन मोदींचा पर्दाफाश राज ठाकरे यांनी केल्याचे मानले जात आहे. पुलवामात ४० जवान शहीद झाल्यानंतर दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचे राजकारण मोदी करत आहेत. मुळात या हल्ल्यांमध्ये दहशतवादी मारले गेल्याचे किंवा नुकसान झाल्याचे पुरावेच उपलब्ध नाहीत आणि पुरावे मागणाऱ्यांना ‘राष्ट्रविरोधी’ ठरविले जात असल्याबद्दल ठाकरेंनी अमित शहा आणि मोदींवर संशय व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार नसल्याने राज ठाकरे यांच्या वक्तव्यात तथ्य असल्याचे मानले जात आहे.

यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाने लष्कराचा अथवा शहिदांचा वापर मते मिळविण्यासाठी केला नव्हता. मोदीतर शहीद जवानांचे सतत स्मरण राहवे म्हणून मते मागत आहेत. याच मोदींनी व्यापाऱ्यांचे साहस जवानांपेक्षा मोठे असल्याचे म्हटले होते, हे राज ठाकरे यांनी नांदेडच्या सभेत उदाहरणासह पटवून दिल्याने मोदींच्या प्रचारकी भाषणे आता संशयाच्या फेऱ्यात सापडली आहेत, असे बोलले जात आहे.

देशातील प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणीटंचाई, मेक इनइंडिया, स्टार्टअप, बेरोजगारी, गोमांस आणि कथित गोहत्येवरुन हिंसाचार, नोटबंदीने झालेली होरपळ इत्यादी अनेक प्रश्नांवर मोदी काहीच बोलत नाहीत, याकडे राज ठाकरे लक्ष वेधत असून प्रचारासाठी पाकिस्तानचे भूत लोकांसमोर मोदी नाचवत असल्याची भावना मतदारपर्यंत पोहचविण्यात राज ठाकरे यशस्वी होत असल्याची लोकांची खात्री पटू लागली आहे. राज ठाकरेंच्या सभा कोणत्याही पक्षासाठी नाहीत तर त्यांचा विरोध मोदी आणि शहा यांना असून या दोन व्यक्तींच्या ताब्यात पुन्हा देश दिला तर देश बरबाद होईल, हाच संदेश देण्यासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत.


लेखक प्रा. रमेश शेजवळ हे नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. 
First Published on: April 14, 2019 4:56 PM
Exit mobile version