अपूर्व उत्साहात रंगला रामजन्म सोहळा

अपूर्व उत्साहात रंगला रामजन्म सोहळा

पहाटेच्या काकड आरतीपासून शनिवारी, १३ एप्रिलला पंचवटीतील श्री काळाराम मंदिरासह शहरातील इतरही मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. रामनवमीनिमित्ताने शहर व जिल्ह्यातील भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात मागील ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काळाराम मंदिरात पहाटे ५ वाजता नरेंद्र पुजारी यांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली. दुपारी १२ पुर्वी मंदिरात जमलेल्या हजारो भाविकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बाराच्या ठोक्याला आरतीने रामजन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराबाहेर भाविक महिलांनी रामजन्माची गाणी गात, फेर धरत जल्लोष केला. रात्री ८ वाजता श्रीरामाला अन्नकोटाचा ५६ भोगांचा नैवेद्य दाखविण्यात आला. यात ५६ प्रकारचे विविध गोडधोड पदार्थ मांडण्यात आले होते. पुराणकाळात प्रभू श्रीराम जेव्हा वनवासातून परत आले होते. त्यावेळी कौशल्यामातेने रामाला ५६ प्रकारच्या गोड पदार्थांचे जेवण दिले होते.

संध्याकाळी वैभव पूजारी यांनी पूजा केली. एक दिवस आधी शुक्रवारच्या रात्री श्रीराम मुर्तीच्या मागील प्रभावळ काढण्यात आली होती. बालरुपातील श्रीरामाचे स्मरण व्हावे, हा त्यामागील उद्देश असल्याचे उमेश पूजारी यांनी सांगितले. शहरातील विविध भागातील मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

First Published on: April 13, 2019 6:01 PM
Exit mobile version