भाजपमधील अस्वस्थ मंडळी काँग्रेसच्या संपर्कात

भाजपमधील अस्वस्थ मंडळी काँग्रेसच्या संपर्कात

नाशिकमध्ये झालेल्या विभागस्तर आढावा बैठकीत बोलताना बाळासाहेब थोरात.

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, म्हणून बहुजन वंचित आघाडीला काँग्रेससोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा पक्षाचा काहीच विचार नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेल्या एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये परवड झाल्याने ते अस्वस्थ आहेत. भाजपमधील अस्वस्थ मंडळी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकार्‍यांची तुपसाखरे लॉन्स येथे शुक्रवारी (दि.26) विभागस्तर आढावा बैठक झाली. त्यावेळी थोरात पत्रकार परिषदेत बोलत होेते. ते म्हणाले, गटबाजी सर्वच पक्षांत आहे. मात्र, भाजपला सत्तेची हाव सुटली आहे, अशी टीका करीत थोरात यांनी कर्नाटक आणि गोवा येथील सुरू राजकीय घडामोडीवर भाष्य केले. आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी महत्वाची आहे. त्यासाठी पक्षात संघटनास्तरावर महत्वाचे बदल पाहायला मिळतील. निवडणुकीत महिला आणि युवकांना संधी देण्याचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात मॉब लिंचिंगसारखे प्रकार घडत असताना विचारवंतांनी त्याचे समर्थन करणे चुकीचे आहे. हा प्रकार देशासाठी घातक आहे. पंतप्रधानांनी यावर प्रतिबंध म्हणून संसदेत कठोर कायद्याचा प्रस्ताव आणण्याचे आवाहन केले. काँग्रेसमधून छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. आता तेथून शिवसेनेत जाण्याची छगन भुजबळांची राजकीय परवड असल्याचे थोरात यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. काँग्रेसच्या आढावा बैठकीला कार्याध्यक्ष मुझ्झपर हुसेल, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, आ.निर्मला गावित, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शिरिष कोतवाल, अनिल आहेर, डॉ.हेमलता पाटील, शाहू खैरे, यांच्यासह नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रदेशस्तर पदाधिकारी, विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री जनता ठरवते

भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून स्पर्धा निर्माण झाल्याचे बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, मुख्यमंत्री जनता ठरवते. भाजप आणि शिवसेना वेगवेगळ्या यात्रा काढून स्वतःच्या पक्षाचा उमेदवार परस्पर कसा जाहीर करीत आहेत. जनता अशा प्रवृत्तीला निवडणुकीत जागा दाखवून देईल. काँग्रेस सोडून गेले. त्यांचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

First Published on: July 27, 2019 7:30 AM
Exit mobile version