उद्योगविकासासाठी ‘सीटू-निमा’चे मनोमिलन

उद्योगविकासासाठी ‘सीटू-निमा’चे मनोमिलन

कामगारांचे प्रश्न सुटावेत आणि कंपन्यांचीही प्रगती साधली जावी, अशा दुहेरी हेतूने कामगारांसाठी लढा देणारी सीटू आणि औद्योगिक विकासासाठी कार्यरत निमा या दोन्हीही संघटनांचे अनेक वर्षांनंतर अखेर मनोमिलन झाले.

सातपूर येथील निमा हाऊस येथे शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी निमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशिकांत जाधव, सीटूचे नेते डॉ. कराड, निमाचे पदाधिकारी तुषार चव्हाण, कैलास आहेर, किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी दोन्हीही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार-कंपन्यांचे प्रश्न एकत्रितपणे सोडविण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. गेल्या काही वर्षांपासून असलेली मंदी आणि कामगारांचे प्रलंबित प्रश्न यामुळे या दोन्हीही संघटना वेगवेगळ्या वाटेने जात असल्याचे चित्र आहे. मात्र, आता अध्यक्षपदाला लाभलेल्या राजकीय पार्श्वभूमीमुळे मनोमिलनातून सकारात्मक बदल दिसू लागल्याचे चित्र आहे.या बैठकीत औद्योगिक क्षेत्राशी निगडीत वीज, कर, कामगार कायदे अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली. कामगारांच्या हक्कासाठी लढणारी सीटू आणि उद्योगांचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने स्थापन निमा या दोन्हीही संघटना एकत्र आल्याने कामगार-कंपन्यांमधील होणारा संघर्ष टळण्यास मदत होणार आहे.

First Published on: August 3, 2019 7:57 AM
Exit mobile version