रिक्षांना मीटरसक्ती, भाडे वाढणार; मीटर अपडेटसाठी १५ दिवस मुदतीची मागणी

रिक्षांना मीटरसक्ती, भाडे वाढणार; मीटर अपडेटसाठी १५ दिवस मुदतीची मागणी

पंचवटी : नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शहरात मीटरप्रमाणे भाडे आकारणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. जे रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारणार नाहीत अथवा ज्यांचे रिक्षा मीटर नादुरुस्त आहेत. अशा रिक्षाचालकांकडून दंड आकारणी करण्याची कारवाई आरटीओने सुरु केली आहे. या कारवाई विरोधात श्रमिक सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी (दि.२२) प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेत, सुरू असलेली दंडाची कारवाई थांबविण्याची मागणी करीत रिक्षा मीटर अपग्रेड करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यासंदर्भात निवेदन सादर केले.

श्रमिक रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक-मालक सेनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. याप्रसंगी श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागूल, जिल्हाध्यक्ष अजय बागूल, जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत पाठक, महानगरप्रमुख मामा राजवाडे, सरचिटणीस नवाज सय्यद, उपजिल्हाध्यक्ष शंकर बागूल आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीनंतर अजूनही, सामान्य रिक्षाचालक कर्जाच्या विळख्यातून बाहेर आलेला नाही. तसेच मीटर दुरुस्ती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आतापर्यंत दिलेला अवधी हा कमी असल्याने, अनेक रिक्षा चालकांचे मीटर दुरुस्ती करणे यासह मीटर कॅलिब्रेशन करणे बाकी आहे. शहरातील काही विभाग असे आहेत, की जिथे प्रवासी शेअरिंग रिक्षाला प्राधान्य देतात. त्यामुळे रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करण्यास तयार असूनही प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नाही. आधी भाडे ठरवून घ्या, त्यानंतर आम्ही रिक्षात बसतो असे प्रवाशांकडून सांगितले जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. सध्या सुरु असलेली रिक्षाचालकांवरील कारवाई तात्काळ थांबवून सामान्य रिक्षाचालकांना मीटर दुरुस्ती व कॅलिब्रेशन करण्यासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा श्रमिक रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक-मालक यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

पहिल्या दीड किलोमीटरला २७ रूपये

ऑटोरिक्षा चालक, मालक प्रवाशांच्या हितास प्राधान्य देऊन प्राधिकरणाने दि.२९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव पारीत केलेला आहे. या ठरावानुसार १ नोव्हेंबरपासून किमान दीड किलोमीटरला २७ रूपये, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रूपये भाडेवाढ लागू झाली आहे. सदर भाडेवाढीस अनुसरुन ऑटो रिक्षापरवानाधारकांनी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑटोरिक्षा मीटरचे पुनःप्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे.

First Published on: November 24, 2022 11:09 AM
Exit mobile version