खासगी जमिनींकडे जाणारे रस्ते रद्द

खासगी जमिनींकडे जाणारे रस्ते रद्द

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांना अंधारात ठेवून खासगी मालकीच्या जमिनीकडे जाणारे 30 लाख रुपयांचे दोन रस्त्यांची मंजूरी अखेर रद्द करण्याचे आदेश जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी दिले आहेत.

इगतपुरी तालुक्यातील देवळे ते आनंदनगर रस्ता व देवळे ते मितेश अ‍ॅग्रो रस्ता रद्द करावे, असे पत्र दिले आहे. डोंगरी विकास कार्यक्रम सन 2020-21 अंतर्गत ही कामे मंजूर करण्यात आली होती. संबंधित योजनेच्या निकषांना डावलून ही कामे झाली आहेत. दरम्यान, या विरोधात महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब धुमाळ यांनी इगतपुरी पंचायत समितीच्या इवद विभागातील सहायक कार्यालयीन अधिकारी अजित गुंफेकर यांना निवेदन दिले होते. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आदिवासी लोकवस्ती नाही अशा ठिकाणी डोंगरी विकास निधी वापरून शासनाची फसवणूक केली आहे. प्रत्येकी १५ लाख अशी ३० लाखांची २ कामे कोणाच्या फायद्याची आहेत, याबाबत देखील संभ्रम होता. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन अधिकार्‍यानी ही दोन्ही कामे रद्द केली असून याबाबत पत्र देखील काढले आहेत.

‘वरसविहीर’ रस्त्याची आठवण

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा या गावांना जोडणार्‍या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले असताना बील मात्र जिल्हा परिषदेने अदा केल्याचा प्रकार जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर यांनी प्रकाशझोतात आणला होता.इगतपुरी तालुक्यातील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरसविहीर ते बोरपाडा या प्रकरणाची नव्याने आठवण झाली.

डोंगरी भागातील कामे करताना त्यांचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. परंतु, खासगी शेताकडे जाणार रस्ता मंजूर करुन त्याचे काम सुरु होते. हा मुद्दा लक्षात आल्यानंतर जिल्हा नियोजन अधिकार्‍यांना पत्र देवून तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. त्यांनी या कामांसाठी निधी देणार नसल्याचे सांगितले आहे.
– हिरामण खोसकर, आमदार

First Published on: June 25, 2021 12:50 PM
Exit mobile version