कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली

कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली

कसारा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने उभी असलेली देवगिरी एक्सप्रेस.

गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटे रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याचवेळी मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे अनर्थ टळला. एकाच महिन्यात पावसामुळे रेल्वे मार्गावर पंधरा दिवसापूर्वी घाटातील बोगद्या बाहेर दरड कोसळली होती. तर आठवड्यापूर्वी अंत्योदय एक्सप्रेसचा डबा रेल्वे घाटातील पुलावर एक डबा रुळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना टळली होती. तसेच, मुंबई- आग्रा महामार्गावर देखील दोन वेळा दरड व एक वेळा झाड कोसळले होते.

दोन दिवसांपासून घाटात जोरदार व संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे २६ जुलैला पहाटे पाचच्या सुमारास कसारा घाटातील मुंबईच्या दिशेने जाणार्‍या तीन नंबर बोगद्याच्या जवळपास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याचवेळी सव्वा पाच वाजता याच रुळावरून मुंबईच्या दिशेने देवगिरी एक्सप्रेस जात होती. घाटात धुके असूनही देवगिरीच्या चालकाला ही दरड कोसळल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने गाडी थांबवल्याने अनर्थ टळला. घटनेची माहीती चालकाने रेल्वे सुरक्षा बलाचे आधिकारी एस.एस.बर्वे यांना दिली. तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रुळावर पडलेली दरड बाजुला करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले. या घटनेमुळे मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेस सुमारे दिड तास कसारा घाटात उभी होती. रेल्वे रुळावरील दरड काढल्यानंतर देवगिरी एक्सप्रेस मुंबईला रवाना केली. मुंबईला जाणारी व मुंबईहून येणारी वाहतूक सुरळीत असल्याची माहीती रेल्वे प्रशासनाने दिली.

First Published on: July 26, 2019 6:59 PM
Exit mobile version