ग्रामीण पोलिसांना वयोवृद्धाचा ‘सॅल्युट’

ग्रामीण पोलिसांना वयोवृद्धाचा ‘सॅल्युट’

पोलीस मुख्यालय

उतारवयात वडिलोपार्जित शेतजमीन कसता येत नसल्याने ती जमीन स्थानिक शेतकर्‍यांनी बळकविली. याप्रकरणी जमीनमालक वयोवृद्धाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्या वृद्धाच्या बाजूने निकाल देत ग्रामीण पोलिसांना शेतजमीन व विहिरीचा ताबा मिळवून देण्याचे आदेश दिले. पोलिसांनी जमिनीवर कब्जा केलेल्या शेतकर्‍यांवर कारवाई करून शेतजमीन व विहिरीचा ताबा त्या वृद्धाला मिळवून दिला. पोलिसांमुळे शेतजमीन व विहीर परत मिळाल्याने वृद्धाने पोलिसांच्या या कृतज्ञतेच्या भावनेने ‘सॅल्युट’ केला.

अमृतधाम येथील नाना गोविंद गिते (८६) यांची मेंढी शिवार (ता. सिन्नर) येथे वडिलोपार्जित शेतजमीन व विहीर आहे. गिते यांना वयोमानामुळे शेतजमीन कसता येत नसल्याने त्यांचे शेतीकडे दुर्लक्ष झाले. ही शेतजमीन पडीक राहत असल्याचे समजताच स्थानिक शेतकर्‍यांनी त्यावर कब्जा केला. ही बाब समजताच गिते यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. शेतजमीन वडिलोपार्जित असल्याने न्यायालयात निकाल गिते यांच्या बाजूला लागला. न्यायालयाने जमीन व विहीरीचा ताबा गिते यांना मिळवून देण्याचे आदेश ग्रामीण पोलिसांना दिले. एम. आय. डी. सी. सिन्नर पोलिसांनी तात्काळ शेतजमीन व विहीर कब्जा करणार्‍या शेतकर्‍यांवर कारवाई केली. त्यानंतर गितेंना जमीन व विहिरीचा ताबा परत मिळवून दिला.

कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असली तरी काही पोलीसांचे गुन्हेगारांशी लागेबांधे असल्याने, आपली जमीन परत मिळणार नाही, असे गिते यांना वाटत होते. मात्र, ग्रामीण पोलीस कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील आणि सामान्य नागरिकांसाठी देवदूत व गुन्हेगारांशी यमदूत असल्याचा अनुभव आला. गिते यांनी पोलीस निरीक्षक एस. टी. पाटील व त्यांच्या सहकारी पोलिसांनी जमीन मिळवून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना पत्र देत मन:पूर्वक आभार मानले.

First Published on: July 21, 2019 6:59 PM
Exit mobile version