जळगाव मतदारसंघात भाजपकडून साहेबराव पाटील यांची दावेदारी

जळगाव मतदारसंघात भाजपकडून साहेबराव पाटील यांची दावेदारी

जळगाव मतदार संघ

भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर जळगाव लोकसभा मतदार संघावरील शिवसेनेचा दावा काहीसा कमी झाल्याचे दिसताच, भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील भूमीपुत्र आणि सध्या पुण्यात अपर पोलीस आयुक्तपदी असलेल्या साहेबराव पाटील यांनीही उडी घेत भाजपाकडून उमेदवारीवर दावा केला आहे. भाजपाचे विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील ऊर्फ अशोक तापीराम पाटील हे दोन वेळा निवडून आले असल्याने, साहेबराव पाटील यांच्या दाव्यामुळे पक्षासह अन्य इच्छुकांपुढील डोकेदुखी वाढली आहे.

पाचोरा तालुक्यातील तामसवाडी येथील मूळ गाव असलेल्या साहेबराव पाटील नाशिकसह महाराष्ट्रातील विविध शहरांत पोलीस अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. उमेदवारीसाठी त्यांनी पोलीस खात्यातील आपल्या वरिष्ठ पदावर पाणी सोडण्याची तयारी केल्याने विद्यमान खासदारांसह जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या प्रबळ दावेदारी करणार्‍या इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे. पाटील यांच्याशी ’आपलं महानगर’ने संवाद साधला असता ते म्हणाले की, ’उमेदवारीबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे. नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचं धोरण, लोकप्रिय आणि प्रशासकीय कामाचा ३५ वर्षांचा अनुभव असल्याने आपल्याला निश्चितच संधी मिळेल.’

जिल्ह्यात अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तालुका, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल आणि रावेर या १५ तालुक्यांचा समावेश होतो. भौगोलिकदृष्ठ्या विचार करता उमेदवारांपुढील आव्हानेही मोठी आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे ए. टी. पाटील यांना मतदारांनी निवडून दिले होते. ते दोन वेळा याच मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे नव्या चेहर्‍यांना संधी देताना पक्षाला ए. टी. पाटील यांच्या कामगिरीचाही विचार करावा लागणार आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी ए. टी. पाटील यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ आणि पाटबंधारे बांधकाम सल्लागार प्रकाश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. साहेबराव पाटील यांच्या दाव्यामुळे इच्छुकांची मनधरणी करतानाच पक्षाची दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

साहेबराव पाटील

स्थानिक ऋणानुबंध कायम

पोलीस खात्यात कार्यरत असलो तरीही अनेक वर्षांपासून वाचनालय, कुस्ती स्पर्धा, यात्रोत्सव अशा उपक्रमांच्या आयोजनातून मी स्थानिक ऋणानुबंध जोपासलेले आहेत. लोकाग्रहास्तव मी उमेदवारीचे पाऊल उचलले आहे. संधी मिळाल्यास नोकरीचा राजीनामा देईन. – साहेबराव पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुणे.

First Published on: March 15, 2019 3:09 PM
Exit mobile version