सटाणा बाजार समिती सभापती सोनवणेंविरोधात अविश्वास मंजूर

सटाणा बाजार समिती सभापती सोनवणेंविरोधात अविश्वास मंजूर

सटाणा बाजार समिती

सटाणा बाजार समितीच्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव तेरा संचालकांनी हात उंचावून मंजूर केला.जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कामकाज पाहिले. सहाय्यक निबंधक महेश भडांगे यावेळी उपस्थित होते.

सटाणा बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांच्याविरोधात तेरा संचालकांनी १८ मे रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यादिवसापासून १३ संचालक अज्ञातस्थळी रवाना झाले होते. या अविश्वास ठराव नाट्याला नुकतीच झालेली लोकसभा निवडणुकीची किनार होती. अविश्वास प्रस्तावासंदर्भात बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी (दि. २७) ११ ला जिल्हा उपनिंबधक गौतम बलसाने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. सभापती मंगला सोनवणे उपस्थित होत्या. बलसाने यांनी प्रस्ताव वाचून दाखवल्यानंतर १३ संचालकांनी हात उंचावून अविश्वास ठराव मंजूर केला. यात संचालक संजय देवरे, प्रकाश देवरे, प्रभाकर रौंदळ, मधुकर देवरे, संदीप शेवाळे, संजय सोनवणे, पंकज ठाकरे, नरेंद्र आहिरे, सरदारसिंग जाधव, वेणूबाई माळी, रत्नमाला सूर्यवंशी, सुनीता देवरे,श्रीधर कोठावदे यांचा समावेश आहे.

उपजिल्हा निबंधक यांनी सभापती मंगला सोनवणे यांना बाजू मांडण्याची संधी दिली. त्यांनी लेखी स्वरुपात बाजू मांडली. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक शशिकांत शिंदे.निरीक्षक वासुदेव देसले, सहायक निरिक्षक गणेश गुरव आदींनी बंदोबस्त ठेवला. बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे उपस्थित होते.

First Published on: May 27, 2019 11:50 PM
Exit mobile version