युतीला बंडखोरांचा जाच

युतीला बंडखोरांचा जाच

स्थायी समितीच्या बैठकीवरून पुन्हा भाजपकडून शिवसेना टार्गेट

पश्चिम नाशिक, नांदगाव आणि निफाड या तीन मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत दुरंगी तर चार मतदारसंघांत तिरंगी लढत होणार असल्याचे माघारीच्या प्रक्रियेनंतर सोमवारी (ता.७) स्पष्ट झाले. पश्चिम नाशिक मतदारसंघात पंचरंगी सामना रंगणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघात मनसेने कोथरुड पॅटर्नची पुनरावृत्ती करीत मतांचे धृवीकरण टाळले आहे. या मतदारसंघात मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी अपेक्षेप्रमाणे माघार घेत राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा मार्ग मोकळा केला.

उमेदवारी अर्ज माघारीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते. त्यादृष्टीने दोन दिवसांपासून युती आणि आघाडीमध्ये बैठकांचे गुर्‍हाळ सुरु होते. बंडखोरांचा त्रास टाळण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाई केली. त्यामुळे काही बंडखोरांनी माघार घेतली असली तरीही तीन मतदारसंघात आता युतीच्या उमेदवारांना घाम गाळावा लागणार आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व बळीराम ठाकरे यांनी माघार घेतली असली, तरीही या पक्षाचे बंडखोर विलास शिंदे यांनी मात्र माघार न घेता भाजप आमदार सीमा हिरे यांना आव्हान दिले आहे. या मतदारसंघात आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण हे माघारीनंतरही स्पष्ट होऊ शकले नाही. राष्ट्रवादीच्या वतीने डॉ. अपूर्व हिरे यांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरीही माकपचे डॉ. डी. एल. कराड यांना काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे. याच मतदारसंघात शिवसेनेतून मनसेत गेलेले दिलीप दातीर हेदेखील उमेदवारी करीत आहेत. नांदगाव मतदारसंघात भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी माघार न घेतल्याने सेनेचे सुहास कांदे यांची डोकेदुखी वाढणार आहे. तर निफाडमध्ये अपक्ष यतीन कदम यांच्या उमेदवारीने शिवसेनेचे आ. अनिल कदम यांना घाम फोडला आहे. पूर्व नाशिक मतदारसंघात ऐनवेळी मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपची उमेदवारी करणारे अ‍ॅड. राहुल ढिकले यांना पराभूत करण्यासाठी आघाडी व मनसे एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप व मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक हे दोन्ही वंजारी समाजाचे असल्याने मतांच्या धृवीकरणाचा फायदा अ‍ॅड. ढिकले यांना होण्याच्या शक्यतेने मुर्तडक यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदारसंघातील थेट लढत चुरशीची होणार आहे. मध्य नाशिक मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या माघारीसाठी मनसेकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आलेत.

अशा होणार लढती – वाचण्यासाठी येथे करा क्लिक

First Published on: October 8, 2019 8:19 AM
Exit mobile version