मोदींच्या सभेवरून युतीत रस्सीखेच

मोदींच्या सभेवरून युतीत रस्सीखेच

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजपचे सुपरस्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यभरात आठ सभांचे नियोजन केले असताना उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकमध्ये सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार नसल्याने ही सभा दिंडोरीत घेण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. याला शिवसेनेने विरोध केला असून ही सभा नाशिकमध्येच व्हावी याकरता शिवसेना अडून बसल्याने मोदींच्या सभेवरून युतीत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते.

पुढील २० दिवसांत दिग्गजांच्या सभांनी नाशिकचे लोकसभेचे रण चांगलेच तापणार आहे. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असली तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे मतदान २३ एप्रिलला होत आहे. उत्तर महाराष्ट्रात ८ पैकी ६ जागा या भाजपाकडे आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी मोदींच्या सभेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी २००९ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना दिंडोरीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंतच्या हायस्कूल मैदानावर सभा झाली होती. ती सभा खासदार चव्हाण यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली होती.

दिंडोरीत भाजपचा उमेदवार असल्याने याच मतदारसंघात मोदींची सभा घेण्यात यावी यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे. याकरीता पिंपळगाव, चांदवड, ओझर , दिंडोरी यापैकी एका ठिकाणी उत्तर महाराष्ट्रासाठी सभा घेण्याचे नियोजन करण्याचे नियोजन आहे. मात्र, सभेच्या दृष्टीने नाशिक हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून सर्वांना सोयीचे आहे, असे सांगत शिवसेनेने नाशिकमध्ये अनंत कान्हेरे मैदानावर ही सभा घेण्यासाठी शिवसेना अडून बसली आहे. पंतप्रधान मोदींची सभा असल्याने एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने करावयाचे नियोजन आणि इतर ठिकाणाहून येणार्‍या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने नाशिक हे सोयीचे ठरू शकते, असे सेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मोदींच्या सभेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांची संख्या मोठी

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शेतकर्‍यांमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. हाच मुददा हेरत आघाडीने शेतकरी केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील बहुतांशी भाग हा शहरी आहे. दिंडोरी लोकसभा हा संपूर्णतः ग्रामीण भागाशी निगडीत असल्याने येथे शेतकरी संख्या मोठी आहे. देशातील बाजारपेठेवर या भागाचे प्रभुत्व असल्याने मोदींची सभा याच मतदारसंघात व्हावी याकरता भाजप आग्रही आहेत.

First Published on: April 4, 2019 11:45 PM
Exit mobile version