महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांवरही होणार परिणाम

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांवरही होणार परिणाम

मतदार नोंदणी, मतदान व मतमोजणी अशा कामानिमित्तच महापालिकचे अधिकारी व कर्मचार्‍यांचा जिल्हा प्रशासन आजवर उपयोग करीत होते. यंदा मात्र जिल्हा प्रशासनाने थेट मतदान होईपर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामासाठी वर्ग करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. परिणामत: शहरातील पाणी पुरवठा, आरोग्य आणि विद्युत अशा अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या आस्थापनावर ७ हजार ९० मंजुर पदे असुन नियमित वेतन श्रेणीवर ५ हजार ८८ पदे कार्यरत आहे. यात अलिकडच्या काळात तीस चाळीस अधिकारी व कर्मचारी स्वेच्छा निवृत्तीने कमी झाले आहेत. तर माजी आयक्त तुकाराम मुंढे यांनी मानधनावर कार्यरत असलेली शेकडो पदे रद्द केली आहेत. महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांवर गेल्याने सरळ सेवा भरती न झाल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मोठा कामाचा ताण आहे. अशी स्थिती महापालिकेची असुन यात ताण तणावातून आत्महत्या झाल्याच्या घटना अलिकडेच झाल्या आहे. पुर्वी लोकसभा – विधानसभा निवडणुकीसाठी मतदान व मतमोजणी कामांसाठीच जिल्हा प्रशासनाकडे महापालिका कर्मचारी वर्ग होत असत. आता मात्र निवडणुकील एक महिना बाकी असतांनाच, तसेच १५ दिवस अगोदरच महापालिकेचे कर्मचारी बोलविण्यात आले आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडुन पुन्हा महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना निवडणूक कामासाठी वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे.

वीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील अत्यावश्यक सेवा बाधीत होऊ नये म्हणुन लोकसभा निवडणुक कामांसाठी पाणी पुरवठा, आरोग्य, गटार व विद्युत या अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या विभागातील कर्मचार्‍यांना निवडणूक कामांसाठी वर्ग करु नये अशी सुचना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अलिकडेच विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत केली होती. असे असतांना जिल्हा प्रशासनाकडून शहराला अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीसाठी वर्ग करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहे. या आदेशामुळे बहुतांशी अधिकारी – कर्मचारी हे जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाले असुन यात पाणी पुरवठा, गटार, आरोग्य व विद्युत या विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

टपाल शाखेचे काम बंद

मतदार नोंदणी कामासाठी काही कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासुनच जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाल्यानंतर आता पुन्हा अधिकार्‍यांसह कर्मचारी मोठ्या प्रमाणात वर्ग करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अधिकारी व कर्मचारी वर्ग झाल्याने महापालिकेची टपाल शाखाच बंद झाल्याचे दिसुन येत आहे. या शाखेतील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग करण्यात आल्याने शासनाच्या संबंधीत असलेले पत्रव्यवहार, नागरिकांकडुन महापालिकेला दिलेले जाणारे अर्ज, निवेदन, तक्रारी यासह इतर सेवा सुविधासंदर्भातील पत्रव्यवहार नोंदवून संबंधित विभागाला हा पत्रव्यवहार करण्याचे टपाल शाखेचे काम ठप्प झाले आहे. तसेच कर विभागात घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीसह कर वसुलीसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने कर वसुलीवर परिणाम झालेला आहे.

First Published on: March 27, 2019 9:08 AM
Exit mobile version