अन्याय होतोय हे उदयनराजेंना आधी कळलं नाही का? – शरद पवार

अन्याय होतोय हे उदयनराजेंना आधी कळलं नाही का? – शरद पवार

शरद पवार

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा असलेले उदयनराजे भोसले काही दिवसांपूर्वी भाजपवासी झाले आणि राष्ट्रवादीला साताऱ्यात मोठं भगदाड पडलं. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच अनेकदा मनधरणी करून देखील उदयनराजे यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे व्यथित झालेल्या शरद पवारांनी अखेर नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजेंबद्दल मनात असलेली खंत बोलून दाखवली. ‘पक्षात अन्याय होत होता, असं सांगत उदयनराजे भाजपमध्ये गेले. पण आपल्यावर अन्याय होत आहे हे त्यांना आधी कळलं नाही का? अन्यायाची समज यायला त्यांना १५ वर्ष लागली?’ असं शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

छगन भुजबळांच्या चर्चेलाही उत्तर

दरम्यान, यावेळी खुद्द शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यामध्ये छगन भुजबळ अनुपस्थित राहिले यावर उलट-सुलट चर्चा सुरू होती. त्यालादेखील पवारांनी उत्तर दिलं. ‘आजचा पूर्ण कार्यक्रम भुजबळांनीच आखून दिला आहे’, असं पवार त्यावर विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले. शरद पवार नाशिक दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र मुंबईमध्ये आहेत.

आघाडीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

एकीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये अजूनही जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत होत नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला मात्र निश्चित झाला आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवणार असून मित्र पक्षांसाठी ३८ जागा सोडण्यात येणार आहेत’, अशी माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.

First Published on: September 16, 2019 4:29 PM
Exit mobile version