शिवाजी चुंभळे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त

शिवाजी चुंभळे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त

कंत्राटी कर्मचार्‍यास कायम करण्यासाठी तीन लाखांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक झालेले नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांची कारकीर्द ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. राष्ट्रवादीत असताना त्यांनी पक्षांतर्गत वाद वेळोवेळी ओढावून घेतले होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते अधिक वादग्रस्त ठरले. पश्चिम विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करताना त्यांनी अनेकांशी ‘पंगे’ घेतले. तर स्थायी समिती सभापतीपदावर काम करताना अनेकांना वेठीस धरले. बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे आणि त्यांच्यातील वाद सर्वश्रूत आहेत. या वादांचीच चर्चा शनिवारी (ता.१७) दिवसभर सुरु होती.

शिवाजी चुंभळे हे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत भुजबळांनी चुंभळे यांच्या बाजूने वजन टाकल्याने माजी खासदार देवीदास पिंगळेंचा पराभव झाला होता. भुजबळांशी एकनिष्ठतेमुळेच त्यांना यापूर्वी अनेक पदेही मिळालेली आहेत. त्यांची स्नुषा विजयश्री चुंभळे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भुजबळांमुळेच मिळाले, तर नाशिक पश्चिम मतदारसंघातून चुंभळेंनी विधानसभेची उमेदवारीही मिळवली होती. परंतु, त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीतही मतदारांवर अती ‘माया’ केल्याने त्यांची उमेदवारी चर्चेत आली होती.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून भुजबळ काका-पुतण्याला कारागृहात जावे लागल्याने राष्ट्रवादीतील सर्व चक्रे उलटी फिरायला सुरुवात झाली. त्यातच चुंभळेंवरील राष्ट्रवादीतला वरदहस्त संपुष्टात आला. याच काळात बाजार समिती, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुंभळे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले होते. १७ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांनी रितसर राष्ट्रवादीचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेच्या वतीने त्यांच्या घरात महापालिका निवडणुकीसाठी दोन उमेदवार्‍याही बहाल करण्यात आल्या. त्यात कल्पना चुंभळे या शिवसेनेकडून निवडूनही आल्या. त्यानंतर शिवाजी चुंभळेंनी शिवसेनेच्या मदतीने बाजार समितीचे सभापतिपदही मिळवले. त्यामुळे चुंभळे शिवसेनेत स्थिरावल्याची चर्चा होती. परंतु, लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने करवाढीच्या मुद्यावरून महापालिकेवर काढलेल्या मोर्चात चुंभळेंनी भुजबळ काका-पुतण्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेतल्याने राष्ट्रवादीतल्या नेत्यांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यांच्याच प्रभागातील नगरसेविका कल्पना पांडे यांच्याशीही त्यांचे नेहमीच खटके उडायचे. शहरभर होर्डिंग लावून आपण भुजबळांचे कट्टर समर्थक असल्याचे ते नेहमीच भासवत होते. महापालिकेचे स्थायी समितीचे सभापतीपद चुंभळेंना मिळाल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी त्यांचे वाद झाले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारीवर दावा करुन खासदार हेमंत गोडसेंना आव्हान दिले होते. दरम्यानच्या काळात चुंभळे यांच्या पूत्राचे अनेक कारनामेही चर्चेत आले होते.

बाजार समितीच्या राजकारणातही चुंभळे नेहमीच चर्चेत राहिले. बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी खासदार देविदास पिंगळे यांचे जवळचे नाते आहे. असे असतानाही या दोघांमधून काही वर्षांपासून विस्तवही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. बाजार समितीच्या कार्यकारणीची निवडणकीत त्यांनी पिंगळे यांच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. या निवडणुकीत पिंगळेंना पाय-उतार करण्यास शिवाजी चुंभळेच कारणीभूत ठरले होते. मतदान केंद्राच्या आवारात चुंभळे आणि पिंगळे समर्थकांमध्ये तुफान हानामारी झाली होती. पिंगळे यांनी बाजार समितीच्या कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीतील फरकांची रकम भरण्यापोटी लाच मागितल्याने त्यांना अटक झालेली होती. या अटकेचे भांडवल करून चुंभळे यांनी बाजार समितीत निवडणकीत पिंगळे यांची 20 ते 25 वर्षाची सभापतीपदाची कार्यकीर्द अस्तागत केलेली होती. त्यानंतर पिंगळे यांना दीड महिने कारावासही झाला होता. तर त्यांना तडीपारही करण्यात आलेले होते. तर गत महिन्यात 3 जुलैला पिंगळे यांची चौकशी एससीबीने केलेली होती. त्यावेळी शिवाजी चुंभळेंशी असलेले पिंगळेचे वैर चर्चेत आलेले होते.

बाजार समितीचे सभापतीपद मिळाल्यानंतर चुंभळे यांनी पिंगळे यांच्या कार्यकीर्दीतील अनेक कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणले होते. पिंगळे सभापती असताना पेठरोडवरील शरदचंद्र पवार या नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या विनापरवानगी गाळ्यांचे कामांची चौकशीही चुंभळे यांनी लावली होती. त्यामुळे हे दोन्ही आजी-माजी सभापती एकमेकांना पाण्यात पाहात होती. योग्यवेळ साधून एकमेकांचा राजकीय सुड काढण्याच्या प्रतिक्षेत होती. तक्रारदार व्यक्तीही दोघांची नातलगच असल्याने चाललुचपत विभागाची चुंभळेंवर झालेली कारवाई, ही नाते-गोत्यातील वादाचा परिणामच असल्याची वाच्यता बाजार समितीत सुरू होती. त्यामुळे शिवाजी चुंभळे यांना लाच स्विकारताना झालेली अटक, त्याचबरोबर माजी सभापती यांच्यावरही एसीबीने पूर्वी दाखल केलेले गुन्ह्यांमुळे नाशिक बाजार समितीचे सभापतीपद हे भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले असल्याची भावना शेतकरी, व्यापारी, कामगार आणि आडत्यांमध्ये झालेली आहे.

झाडाझडतीत दिसले व्हेंटिलेटर

एसीबी पथकाने निवासस्थानी झाडाझडती घेत असताना चुंभळे यांच्या बेडरुमची तपासणी सुरु केली केली. त्यावेळी बेडरुममध्ये वैद्यकीय औषधे व बेडला व्हेंटिलेटर लावलेले दिसले. हे सर्व पाहून पथकसुद्धा अवाक झाले. याप्रकरणी एसीबी पथकाने कुटुंबियांना विचारणा केली असता चुंभळे यांना व्हेटीलेटर लावल्याशिवाय झोप येत नाही. विना व्हेंटिलेटर त्यांना झोपेताना छातीचा त्रास होतो.

मद्यसाठ्याची ’एक्ससाईज’ करणार तपासणी

‘एसीबी’च्या पथकाला झाडाझडती विदेशी मद्यसाठा सापडल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी केली जात आहे. एखाद्या व्यक्तीला घरात किती मद्यसाठा करता येतो. विदेशी दारु किती लिटर आहे, त्याची एकूण किती किंमत होऊ शकते, याची तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

मुलाकडून तक्रारदाराला धमकी

’एसीबी’ने शिवाजी चुंभळे यांना अटक केल्याचे समजताच मुलगा अजिंक्य याने तक्रारदार रविंद्र भोये यांना बाजार समितीच्या आवारातील हॉटेल गोंधळजवळ गाडी आडवी लावुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भोये यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात अजिंक्य चुंभळेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कार्यालयाबाहेर समर्थकांच गर्दी

शिवाजी चुंभळे यांची शनिवारी पुन्हा एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. लाचप्रकरणी चुंभळे यांना अटक झाल्याची समजल्यापासून त्यांचे समर्थक एसीबी कार्यालयाबाहेर गर्दी करत आहेत. शनिवारी पुन्हा एसीबी कार्यालयाबाहेर समर्थकांनी गर्दी केली.

First Published on: August 17, 2019 11:59 PM
Exit mobile version