धक्कादायक ! त्या महिलेच्या संपर्कातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक ! त्या महिलेच्या संपर्कातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बागलाण तालुक्यात बुधवारी (दि. २७) पुन्हा चार व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा ६ झाला आहे. तर, एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. बाधितांच्या निवासस्थानापासून ३०० मीटरचा परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. बाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे.

मोसम खोर्‍यातील वरचे टेंभे येथील कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर, तिच्या संपर्कातील १२ पैकी २ व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. इतर १० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सदर मृत महिला देवळा तालुक्यातील वासोळपाडे येथे माहेरी गेली होती. तेथे तिच्या संपर्कातील ११ व्यक्तींचे अहवालेखील निगेटिव्ह आले आहेत. या महिलेच्या अंत्यविधीस गेलेल्या वरचे टेंभे गावातील १४ नातेवाईकांनाही क्वांरटाईन करण्यात आले आहे. अंत्यविधीस १४ नातेवाईकांनी एकाच वाहनातून प्रवास केला. याकडे प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे पुढील वैद्यकीय अहवाल काय येतात, याकडे मोसम खोर्‍याचे लक्ष लागून आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वरचे टेंभे येथील ५० वर्षीय १ महिला, तर १० वर्षीय मुलगा असे २ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने बागलाण तालुक्याची चिंता वाढली आहे. तालुक्यात एकाचवेळी ४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ६ वर पोहोचली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा परिसर सील करण्यात आला आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करत आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन तालुका वैदकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांनी केले आहे.

First Published on: May 27, 2020 3:44 PM
Exit mobile version