रेडझोनमधील दुकाने आता सकाळी ९ ते ५ खुली राहणार

रेडझोनमधील दुकाने आता सकाळी ९ ते ५ खुली राहणार

शहरातील रेड झोनमधील दुकाने सुरू ठेवण्यासाठी आता दोन तासांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असून दूध विक्रिसाठी दिलेल्या वेळेतच विक्री करता येणार आहे.

करोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. या काळात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री व्यतिरिक्त सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर देशात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. नाशिक शहरासह रेडझोनमधील जीवनाश्यक वस्तूंची दुकाने प्रतिबंधित क्षेत्र वगळून सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर ४ मे पासून शासन निर्देशानूसार जीवनाश्यक वस्तू वगळून वैयक्तिक स्वरुपाची दुकाने सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली. मात्र सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहत असल्याने या वेळेमध्ये बाजारपेठेमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. त्यातच दुपारच्या सुमारास रणरणते उन असल्याने सकाळच्या टप्प्यात बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टसिंग पाळले जात नसल्याचे आढळून आले. दुकाने उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांबाबत जिल्ह्यात एकसारखेपणा व सुसुत्रता कशी राहील याची काळजी घेण्यात यावी. जेवढ्या अधिक संख्येने दुकाने उघडतील तेवढी कमी गर्दी, जेवढा वेळ जास्त दुकाने सुरू राहतील तेवढी गर्दी कमी याबाबत सारासार विचार करून सर्व यंत्रणांनी सर्व आपआपसात संमतीनेच निर्णय घ्यावा असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. त्यानूसार आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली असली तरी, पूर्वीप्रमाणेच एकल पध्दतीनेच दुकाने सुरू करता येणार आहे. त्यामुळे सर्व दुकानांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ दुकाने खुली ठेवण्यासाठी पूर्वीच्या वेळेत वाढ करण्यात येउन आता सकाळी ९ ते ५ या वेळेत दुकाने सुरू राहणार आहेत असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

First Published on: May 7, 2020 7:59 PM
Exit mobile version