श्री घाटनदेवी नवरात्रोत्सव रद्द

श्री घाटनदेवी नवरात्रोत्सव रद्द

इगतपुरी : श्री घाटनदेवी नवरात्र उत्सव संबंधी घाटनदेवी मंदिरात आगामी नवरात्र उत्सव बाबत प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्या निर्देशानुसार बैठक घेण्यात आली. ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दुर्गापूजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही अशा मार्गदर्शक सूचना तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिल्या. तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोनामुळे फक्त दर्शन होणार असून यात्रा रद्द केल्याची माहिती तहसीलदार कासुळे यांनी दिली.

यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षीप्रमाणे शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा असे आवाहन पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी पंकज गोसावी, महावितरणचे कनिष्ठ अभियंता साताळे, आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे, विद्युत विभागाचे पवार, गोपनीय विभागाचे विजय रुद्रे, मंदिराचे विश्वस्त सतीश चांदवडकर आदी उपस्थित होते.

First Published on: October 7, 2021 10:15 AM
Exit mobile version