मविप्र संस्थेत श्रीराम शेटेची एंट्री

मविप्र संस्थेत श्रीराम शेटेची एंट्री

नाशिक : शैक्षणिक क्षेत्रात 113 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यांना कुठल्या पदासाठी उमेदवारी द्यायची हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी वरच्या पदासाठीच त्यांचा विचार केला जाणार आहे.

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होणार असल्याने त्यादृष्टीने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच बाळासाहेब पिंगळे यांच्या नावाने सोशल मीडियावर सरचिटणीस पदासाठी श्रीराम शेटे यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचे मेसेज व्हायरल झाला आहे. पिंडतराव पिंगळे हे संस्थेचे ज्येष्ठ सभासद असून, त्यांना डावलून श्रीराम शेटे यांना सरचिटणीसपदाची उमेदवारी देणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस व मविप्र संस्थेवर अन्याय असल्याची भावना त्यांनी या मेसेजमध्ये व्यक्त केली आहे. सरचिटणीस नीलिमा पवार यांना श्रीराम शेटे यांच्याविषयी आत्मियता असेल तर त्यांनी शेटे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. परंतु, संस्थेमध्ये अनुभवी व्यक्तींनाच सरचिटणीस म्हणून उमेदवारी द्यावी. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्याशी व त्यांच्या विचारांशी रक्ताचे नाते आहे. आणि ते आम्ही निरंतर चालू ठेवणार याची जाणीव सर्वांनाच आहे. त्यामुळे सरचिटणीसपदासाठी पिंगळे यांचाच विचार व्हायला हवा, असा आग्रह त्यांनी आपल्या मेसजद्वारे केला आहे. या मेसेजमध्ये त्यांनी कै.डॉ.वसंतराव पवार यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. या एका मेसेजमुळे संस्थेच्या निवडणुकीविषयी वातावरण निर्मितीला सुरुवात झाल्याचे आता बोलले जात आहे.

ऑगस्ट 2017 च्या निवडणुकीत श्रीराम शेटे यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांना संस्थेत प्रवेश करता आलेला नाही. यंदाच्या निवडणुकीत दोन मोठे फेरबदल झालेले आहेत. एक म्हणजे दोन जागा या महिला संचालकांसाठी राखीव ठेवण्यात येतील. दुसरे म्हणजे संस्थेने उपाध्यक्षपद निर्माण करुन एका जागेची निर्मिती केल्यामुळे इच्छुकांना या जागेवर निवडणूक लढवता येणार आहे. त्यामुळे श्रीराम शेटे यांचा मविप्र संस्थेत प्रवेश होणार असला तरी तो अध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष, सभापती, चिटणीस, उपसभापती या वरच्या पदासाठी विचार करण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे.

 

“संस्थेच्या निवडणुकीला अद्याप सुरुवातही झालेली नाही. मात्र, शेटे साहेब हे आमच्या पॅनलमध्ये निश्चितपणे असतील. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या संदेशांवर कसा विश्वास ठेवणार” : नीलिमा पवार,सरचिटणीस, मविप्र संस्था

 

मविप्र समाज संस्थेत सरचिटणीस पदासाठी निवडणूक लढवण्याची सभासदांची भावना त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. परंतु, त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे सभासदांच्या या चर्चेला सध्यातरी काही अर्थ नाही. : श्रीराम शेटे,अध्यक्ष, कादवा सहकारी साखर कारखाना

First Published on: June 8, 2022 2:49 PM
Exit mobile version