साहेब, जाता जाता आमच्या घामाच्या पैशाचं बघा; औष्णिक वीज केंद्र कामगारांची आर्त हाक

साहेब, जाता जाता आमच्या घामाच्या पैशाचं बघा; औष्णिक वीज केंद्र कामगारांची आर्त हाक

नाशिक : एकहलरे औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना शासकीय नियमानुसार वेतन वाढीचा फरक व भत्ते अदा करण्याचे आदेश कामगार उपायुक्तांनी प्रशासनाला दिलेले असतांना अद्याप अनेक कामगार त्यांच्या हक्कापाचून वंचित आहेत. कामगार उपायुक्तांच्या आदेशाला दोन महिने उलटून गेल्यानंतरही कामगारांना लाभ मिळत नसल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत.

कामगार आयुक्तालयाने गंभीर दखल घेत गेल्या महिन्यात एकलहरे येथे भेटीत कामगार उपायुक्तांनी प्रशासनास कंत्राटी कामगारांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे आदेश दिले होते, १ जानेवारी २०२० पासून किमान वेतनावर २० टक्के वेतन वाढ फरक ठेकेदारांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे, प्रशासनाने ३१ मार्च २०२२ पर्यंत किमान वेतन, वेतनावरील फरक, लागू भत्यांचा फरक व इतर फरक देण्याचे परिपत्रक काढले होते, असे असतांना दोन महिने उलटले तरीही कामगारांना त्यांच्या घामाचा पैसा मिळत नसल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्या आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना यांनी मुख्य अभियंता यांना कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतना बाबत पत्र दिले आहे. मुख्य अभियंता एन.एम.शिंदे हे दोन दिवसांत सेवा निवृत्त होणार असल्याने त्यापुर्वी दोन दिवसांत ठेकेदारांची बैठक घेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले आहे.

“कामगार उपायुक्तांच्या आदेशाप्रमाणे एकलहरे प्रशासनाने तत्काळ कंत्राटी कामगारांच्या फरकाची रक्कम व भत्ते यांच्या थकीत रकमेचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आमची संघटना महानिर्मिती व्यवस्थापन व सबंधित ठेकेदार कामगार न्यायालयात धाव घेणार आहे” : सचीन भावसार, उपाध्यक्ष, राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना

First Published on: May 28, 2022 12:26 PM
Exit mobile version