नाशिक शहरासह सात तालुके ‘ रेड झोन’ मध्येच

नाशिक शहरासह सात  तालुके ‘ रेड झोन’ मध्येच

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाउन सुरू करण्यात आला असला तरी,
वाढलेल्या लॉकडाउनमुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्यातील काही जिल्हयांमध्ये काहीशी शिथीलता जरी दिली असली तरी, नाशिक शहरासह देवळाली कॅन्टोनमेंट क्षेत्र, मालेगाव महापालिका क्षेत्र, उर्वरित मालेगाव तालुका, निफाड, चांदवड, सिन्नर, येवला आणि नांदगाव हे सात तालुके मात्र रेडझोनमध्येच असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये १७ मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. तसेच उर्वरित तालुके मात्र ऑरेंज झोन घोषित करण्यात आले असून शासन निर्देशानूसार या क्षेत्रात काहीअंशी शिथीलता देण्यात येईल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने सर्व विभागीय अधिकारी, जिल्हाधिकार्‍यांसमवेत बैठक जिल्हानिहाय आढावा घेत करोनाचा प्रभाव नसलेल्या जिल्हयांमध्ये काहीशी शिथीलता दिली. राज्य शासनाने झोन नुसार शिथीलता दिली असली तरी रेड झोनमध्ये मात्र जीवनावश्यक वस्तू वगळता लॉकडाउनचे नियम कायम राहणार आहे. राज्य शासनाने ४ मे पासून लॉकडाउनमध्ये शिथीलता दिल्याचे संदेश सोशल मिडीयाव्दारे व्हायरल झाल्याने सोमवारपासून शहरात दैनंदिन व्यवहार पूर्ववत होणार कि काय याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. अनेकांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधत याबाबत विचारणाही केली. सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्स नंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबत स्पष्टीकरण देतांना सांगितले की, शासनाने दिलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार जिल्ह्याची अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. मात्र रेड झोनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्थानिक जिल्हा प्रशासनास दिलेल्या अधिकारानुसार नाशिक महानगरपालिका, देवळाली कन्टोनमेंट क्षेत्र, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र उर्वरित मालेगाव तालुका, निफाड तालुका, चांदवड तालुका, सिन्नर तालुका, येवला तालुका, नांदगाव तालुका या क्षेत्रांमध्ये गेल्या २१ दिवसात रुग्ण आढळून आलेले असल्याने व एकंदरीत परिस्थितीचा सारासार विचार करून त्या क्षेत्रास रेड झोन असे घोषित करण्यात येत आहे. उर्वरित संपूर्ण जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असणार आहे व त्याठिकाणी मूळ अधिसूचनेत ऑरेंज झोन मध्ये शासन निर्देशानूसार सवलती देण्यात येतील. याबाबतची अधिसूचना लवकरच संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता नाशिक शहरासह करोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या भागात लॉकडाउन कायम राहणार असून या ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असेल हे स्पष्ट झाले आहे.

ऑरेंज झोनमध्ये कोणत्या सवलती दिल्या जातील याबाबत लवकरच अधिसूचना प्रसिध्द केली जाईल. मात्र नाशिक शहरासह उर्वरित भागात मात्र पूर्वीप्रमाणेच लॉकडाउन कायम राहणार आहे.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

हे तालुके ऑरेंज झोनमध्ये
सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, इगतपुरी, त्र्यंबक, देवळा

First Published on: May 3, 2020 10:12 PM
Exit mobile version