‘श’ न उच्चारता शिवसेनेला शालजोडीतले!

‘श’ न उच्चारता शिवसेनेला शालजोडीतले!

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना युतीमध्ये घेण्यास टोकाचा विरोध करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना खासदारकीची उमेदवारीही गमवावी लागली. त्यामुळे आता त्यांना चांगलीच अद्दल घडली असून नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेचा ‘श’देखील उच्चारला नाही. महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपमुळेच राज्यात सर्वत्र बहुमत मिळाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उंची अधिक असल्याने त्यांच्या व्यासपीठावर कोणाला बसवायचे याचा प्रोटोकॉल ठरविला जातो अशी वक्तव्य करून त्यांनी शिवसेनेचा उल्लेख न करता या पक्षाची जणू पात्रताच दाखवून दिली. त्यामुळे सेनेला डिवचण्याची सवय सोमय्या यांची गेली नसल्याचे स्पष्ट झाले. 

मुंबई महापालिका निवडणुकीवेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. उद्धव यांंना लक्ष्य करताना सोमय्यांनी वांद्य्राचा बॉस, मुंबईचे माफिया असे शब्द वापरले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वीही भाजपचे श्रेष्ठी शिवसेनेबरोबर युती करण्याच्या मानसिकतेत असताना सोमय्या यांनी स्वबळावर भाजप निवडणूक लढणार असल्याची वाच्यता वारंवार केली होती. या निवडणुकीत युती झाल्यानंतर सोमय्या यांनी त्यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघावर दावा केला होता. मात्र येथील शिवसैनिकांनी त्यांना टोकाचा विरोध केल्याने त्यांना उमेदवारीही नाकारण्यात आली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसमोर बंडखोर उभे केल्याने सोमय्या आपली खुमखुमी बाहेर काढतील, अशी भाजप कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात सोमय्या यांनी चुप्पी साधणेच पसंत केले. मात्र, त्यांनी भाजपचे अशा पद्धतीने कौतुक केले की, त्यातून अनुल्लेखाने शिवसेनेची पात्रताच त्यांनी जणू अधोरेखित केले. त्यांनी महायुतीच्या वतीने निवडणूक लढविण्यात येत असल्याचे सांगताना शिवसेनेचा उल्लेखही करणे टाळले. 

त्यावेळचा बोलवता धनी कोण?

शिवसेनेविरोधात वक्तव्य करणार्‍यांना भाजपने बाजूला ठेवले याविषयीचे मत सोमय्या यांना विचारले असता त्यांनी प्रथमत: मिश्कीलपणे हसत तुम्ही थेट माझ्याच तोंडावर असा प्रश्न विचारतात असे सांगत उत्तर देणे टाळले. प्रवासात वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या जबाबदार्‍या दिल्या, त्या प्रामाणिकपणे आपण पार पाडल्याचे सांगत त्यांनी आपला बोलवता धनी अन्य कुणी होता, असेच जणू सांगितले.

सोमय्या यांचे तिरपे बोल…

First Published on: October 17, 2019 9:10 AM
Exit mobile version