मनसेची उद्या भद्रकालीत महाआरती, प्रवीण तरडेंची विशेष उपस्थिती

मनसेची उद्या भद्रकालीत महाआरती, प्रवीण तरडेंची विशेष उपस्थिती

नाशिक : राज्यभरात मनसेकडून भोंग्याच्या विरोधात रान उठवून राज ठाकरे आणि मनसेने हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यातच राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानुसार महाराष्ट्रभरात मनसे कार्यकर्त्यांनी मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ४ मे रोजी आंदोलन केले. त्याचे पडसाद नाशिक शहरातही उमटलेले दिसून आले होते.

आंदोलनानंतर शहरातील सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता. अनेक कार्यकर्त्यांना तडीपार करण्यात आले होते. दरम्यान राज ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौराही तात्पुरता स्थगित करण्यात आल्याने मनसेने आंदोलनात कच खाल्ली की काय असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, त्याच आंदोलनाचा दुसरा अंक नाशिक मधून सुरू होताना दिसतोय.

मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिरात महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून मनसे आपला हिंदुत्वाचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने पुढे घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे.


प्रवीण तरडेंची विशेष उपस्थिती

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा नट, दिगदर्शक, निर्माता, लेखक असलेला आणि मुळशी पॅटर्न, देऊळ बंद, फर्जंद, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे यांसारख्या दर्जेदार कलाकृती साकारणारा प्रवीण तरडे यांची मनसेच्या या धार्मिक कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे. काही दिवसापूर्वी स्वतःला धर्मप्रेमी म्हंटलेल्या तरडेच्या मनसेच्या महाआरतीला उपस्थिती मनसेच्या नाशिक मधील हिंदुत्ववादी मुद्द्याची नवी मुहूर्तमेढ ठरणार का हे बघणे महत्वाचे असेल.

First Published on: May 21, 2022 9:33 PM
Exit mobile version