स्थायी कुणाच्या नशिबात : गीते, बोडके आणि भामरे यांचा दावा

स्थायी कुणाच्या नशिबात : गीते, बोडके आणि भामरे यांचा दावा

स्थायी कोणाच्या नशिबात : गीते, बोडके आणि भामरे यांचा दावा

महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुकीला अखेर मूहूर्त गवसला असून येत्या गुरुवारी (ता. १८) या पदाचा फैसला होणार आहे. विभागीय आयुक्तांनी महापालिकेला याबाबत कळवले आहे. येत्या सोमवारपासून अर्ज वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सभापतीपदासाठी कमलेश बोडके, गणेश गीते आणि स्वाती भामरे यांचा दावा असणार आहे. दरम्यान, स्थायीबरोबरच त्याच दिवशी शहर सुधार, विधी, आरोग्य वैद्यकिय आणि महिला तसेच बाल कल्याण समितीच्या सभापतीपदासाठी देखील याच दिवशी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे काम बघणार आहेत.

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांची मुदत २८ फेबु्रवारीसच संपली परंतु त्यानंतर सदस्य नियुक्त करताना भाजपाच्या कोट्यातून आठ सदस्य नियुक्त करण्यास शिवसेनेने विरोध केला होता. भाजपाच्या एका नगरसेवकाच्या निधनामुळे या पक्षाचे तौलनिक संख्याबळ कमी झाले असून त्यामुळे भाजपाचा एक सदस्य कमी होऊन सेनेचा सदस्य वाढतो असा सेनेचा दावा होता. त्यामुळे न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते. दरम्यान लोकसभा निवडणूक होत असल्याने त्या धामधुमीत विभागीय आयुक्त कार्यालयाने एक सदस्य नियुक्तीस परवानगी दिली नाही. ती आता दिल्यानंतर गेल्या ९ जुलैस समितीवर कमलेश बोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.अन्य समित्यांचे सदस्य देखील पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्त करण्यात आले. सर्व समित्यांवर भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाचेच सभापती होणार हे उघड आहे.

हे आहेत दावेदार-

स्थायी समिती सभापतीपदासाठी पंचवटीचे नगरसेवक गणेश गिते, कमलेश बोडके आणि पश्चिम विभागातील नगरसेविका स्वाती भामरे यांची नावे चर्चेत आहेत. यातील गणेश गिते हे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. तर कमलेश बोडके हे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे खास समर्थक आहेत. मात्र त्यांना सदस्यपद पालकमंत्र्यांच्याच शिफारशीवरुन मिळाले आहे. याशिवाय आमदार देवयानी फरांदे यांच्या निकटवर्तीय असलेल्या स्वाती भामरे यांचे नाव देखील सभापतीपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

येत्या १८ जुलैला होणार्‍या निवडणुकांचे वेळापत्रक :

वेळ- समिती व पदाचे नाव-

दुपारी २ वाजता- स्थायी समिती सभापती
दुपारी ३.३० वा.-विधी समिती सभापती व उपसभापती
दुपारी ४.३० वा. शहर सुधारणा समिती सभापती व उपसभापती
सायंकाळी ५.३० वा. वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती व उपसभापती
सायं. ६.३० वा. महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती

First Published on: July 12, 2019 8:14 PM
Exit mobile version